बघा कोण म्हणाले असे की ,त्यांच्या गेल्यावर हाच पठ्ठा तुमचे काम करणार
सातारा / नवप्रहार डेस्क
साहेब गेल्यावर तुमचे काम हाच पठ्ठा करणार आहे. मी अजून 10 वर्ष काम करू शकतो . असे फलटण येथील सभेत अजित पवार यांनीं वक्तव्य केले आहे. बारामतीमधील एका सभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. राज्यसभेची अजून दीड वर्षे आहेत. तुम्ही या आधी 14 वेळा निवडून दिलं आहे. आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं.
शरद पवारांच्या या वक्तव्याचा आधार घेत अजित पवार म्हणाले, “परवा बारामतीमध्ये भाषण करताना साहेबांनी सांगितलं की माझी मुदत संपल्यावर मी बाजूला होणार. ते राजकारणापासून दूर राहिले तर कामं कोण करणार? हाच पठ्ठ्या कामं करणार. दुसऱ्याचा घास नाही. तिथं आपलं नाणं खणखणीत आहे. मी अजून 10 वर्षे काम करणार.”
बैल म्हातारा झाला, आता त्यांना बाजार दाखवा असं काही जणांनी या आधी म्हटलं होतं. मला त्या खोलात जायचं नाही असंही अजित पवार म्हणाले.
बारामतीचा आमदार होणं सोपं नाही
अजित पवार म्हणाले की, “फलटणचे नेते म्हणतात की, आम्हाला फलटणचा बारामती करायचा आहे. पण बारामती करणं एवढं सोपं नाही. बारामतीचा आमदार पहाटे पाच वाजता उठतो आणि पावणे सहा वाजता कामाला लागतो. तिकडचे रस्ते, इमारती या क्लालिटीचे असतात. क्वालिटीचे काम झालं नाही तर त्याला ब्लॅक लिस्ट केलं जातं. इथे कसलं काम चालतंय ते माहिती नाही. ते श्रीमंतांना विचारावं लागेल.”
साताऱ्याच्या बदल्यात माढा मागितला होता
साताऱ्याच्या बदल्यात माढा लोकसभेची जागा भाजपकडे मागितल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. अमितभाईंना भेटून मी सांगितलं होतं की सातारा सोडतो, तुम्ही मला माढा द्या. पण त्या ठिकाणी रणजित निंबाळकर आहेत असं अमितभाईंनी सांगितलं. माढ्याचं तिकीट लगेच जाहीर केलं असं अजित पवार म्हणाले.
माझ्या दिल्लीमध्ये ओळखी आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला करून देणार. केंद्राचा पैसा हा मोठे प्रकल्प होण्यासाठी आणावाच लागतो. त्यासाठी सत्ता हवीय असं अजित पवार म्हणाले.
बारामतीच्या सभेत काय म्हणाले होते शरद पवार?
बारामतीच्या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, माझी राज्यसभेतील अजून दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे.