राजकिय

शिंदे कडून विधान परिषदेच्या तिकिटाच्या मोबदल्यात या पक्षासमोर ठेवण्यात आली विलीनीकरणाची अट 

Spread the love

विदर्भात भाजपा विरोधात आक्रमक चेहरा उभा करण्याचा शिंदेंचा गेम 
मुंबई  / विशेष प्रतिनिधी 
 
              विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला अवघे चार दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवा गेम खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. असे झाल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजणार आहे. शिंदे यांनी ज्याला उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे. तो विदर्भातला परिचित चेहरा आहे. पण यापूर्वी शिंदे कडून त्या नेत्यांपुढे त्याचा पक्ष शिवसेना शिंदे पक्षात सामील करण्याची अट ठेवली आहे. यामुळे विदर्भात शिंदे गटाची ताकद वाढण्यासोबत भाजपा च्या विरोधात एक दमदार नेतृत्व मिळण्याचा लाभ देखील शिंदे गटाला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊ कोणता आहे तो पक्ष ? आणि कोण आहे तो नेता ? 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ज्या नेत्याला पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली आहे त्या नेत्याचं नाव आहे बच्चू कडू! एकेकाळी लोकसभा निवडणुकांमध्ये  नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध करत महायुती विरोधात भूमिका घेतली होती. त्याच बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र विधानपरिषदेवर येण्यासाठी बच्चू कडू यांना त्यांचा ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी अट बच्चू कडू यांच्या समोर शिवसेनेनं ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 19 एप्रिल रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात अर्धा तास बैठक झाली. यात विधान परिषद उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडू यांना दिलेल्या या ऑफरमुळे अमरावतीसह मुंबईत खळबळ उडाली आहे. भाजपकडून या साऱ्यामध्ये अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे. कडूंवर आरोप, गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.

बच्चू कडू यांना पत्रकारांनी या ऑफरबद्दल विचारलं असता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. “कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईन,” असं बच्चू कडू म्हणाले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी असतानाही बच्चू कडू यांनी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केला नाही.

बच्चू कडू अद्याप प्रहार पक्ष विलीन करण्याबाबत विचार करत आहेत का अशी चर्चा आता अमरावतीच्या राजकीय वर्तुळात आहे. बच्चू कडू स्वतंत्र राहून आंदोलनांसंदर्भातील काम सुरु ठेवत शिवसेनेत सामील होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ही ऑफर स्वीकारली तर बच्चू कडू पुन्हा आमदार (एमएलसी) होतील आणि ‘प्रहार’चा आवाज थेट विधान परिषदेत पोहोचेल. आता बच्चू कडू यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग कल्याण, विधवा पेन्शन यांसाठी बच्चू कडू यांनी अनेक अभिनव आंदोलने जमिनीत गाडून अर्धदफन, अन्नत्याग, पदयात्रा यासारख्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आहे. मागच्या वर्षी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत मोठे शेतकरी आंदोलन उभे केले. यामध्ये त्यांनी हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारला कर्जमाफी समिती आणि पॅकेजची घोषणा करायला भाग पाडले.शिक्षक, अपंग, शेतकरी यांच्या प्रश्नावर सातत्याने बच्चू कडू आक्रमक भूमिका घेताना दिसतात. वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करतात. त्यामुळेच सत्ताधारी-विपक्ष दोघेही त्यांना गांभीर्याने घेतात. म्हणूनच बच्चू कडू शिवसेनेची ऑफर स्वीकारुन विधान परिषदेवर गेले तर शिंदेंच्या शिवसेनेला अमरावतीमध्ये आणि विदर्भामध्ये एक भक्कम चेहरा मिळेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close