भूस्खलनात दोन डंपर मातीत गाडल्या गेले , सुदैवाने जीवित हाणी नाही

प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील उकणी कोळसा खाणीत झालेल्या भूस्खलनामुळे दोन डंपर मातीत गाडल्या गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मातीचा डोंगर कोसळल्याने ही घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उकणी खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने माती हटवून कोळशाचं उत्खनन केलं जातं. सुमारे शंभर मीटरपर्यंत खोदकाम केल्यानंतर कोळशाचा थर मिळत असल्याने खाणीत अतिशय खोल खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचं सांगितले जाते. हे पाणी पंपाच्या साहाय्याने बाहेर काढून वर तयार करण्यात आलेल्या शिल्ड (तलाव) मध्ये साठवले जाते.
आज याच पाण्याखाली असलेल्या कोळशाच्या उत्खननाचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक शिल्डला लागून असलेला बांध खचला. त्यामुळे गाळयुक्त पाणी आणि मातीचा प्रचंड प्रवाह खाली आला. त्याच्या तडाख्यात दोन डंपर पूर्णपणे दबले गेले. घटनेनंतर खाण परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही चालक कसाबसा डंपरमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित स्थळी पोहोचले.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
या घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कामगारांचा आरोप आहे की, वेकोली प्रशासन सुरक्षा सप्ताहाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करते, मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. या घटनेनंतर संतप्त कामगारांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गंभीर घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची कामगारांची मागणी केली आहे.




