हटके

रेल्वेतून नवविवाहिता बेपत्ता ; सहा दिवस उलटूनही लागेना पत्ता

Spread the love

देहरादून / विशेष प्रतिनिधी

                          रेल्वे प्रवासादरम्यान नवविवाहिता गायब झाल्याने पती शॉक मध्ये आहे. जोडपे बाबा केदारनाथचे दर्शन घेऊन परततात असताना देहरादून – गाझियाबाद ट्रेन मधून महिला गायब झाली आहे. प्रज्ञा सिंह असे तिचे नाव आहे. सहा दिवस उलटूनही तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही, ज्यामुळे रेल्वे सुरक्षा आणि पोलीस तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर पती मनीष अग्रहरी चिंतेत आहे.

नेमकी घटना काय?

मूळचे कानपूरचे असलेले मनीष अग्रहरी आणि प्रज्ञा सिंह यांनी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेमविवाह केला होता. मनीष ग्रेटर नोएडातील एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला आहे. लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच केदारनाथ दर्शनासाठी गेले होते. ५ मे रोजी दर्शन घेऊन परतताना ते देहरादून स्टेशनवरून गाझियाबादसाठी ट्रेनमध्ये बसले.

पती मनीषने दिलेल्या माहितीनुसार, हरिद्वारपर्यंत दोघांमध्ये बोलणं सामान्य होते. त्यानंतर प्रवासाच्या थकव्यामुळे मनीषचा डोळा लागला. ट्रेन मुजफ्फरनगर स्टेशनच्या जवळ पोहोचली असताना मनीषला जाग आली, तेव्हा प्रज्ञा आपल्या सीटवर नव्हती. सुरुवातीला ती वॉशरूमला गेली असेल असे वाटले, पण बराच वेळ होऊनही ती न परतल्याने मनीष घाबरला.

रेल्वे ट्रॅकजवळ शेवटचे लोकेशन

प्रज्ञाचा शोध घेत असताना एका प्रवाशाने सांगितले की, त्यांनी प्रज्ञाला रुडकी स्टेशननंतर कोचच्या केबिनबाहेर जाताना पाहिले होते. सर्वात चिंतेची बाब म्हणजे प्रज्ञाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन उत्तराखंडमधील लक्सर येथे रेल्वे लाईनच्या कडेला मिळाले आहे. त्यानंतर तिचा फोन सतत स्विच ऑफ येत आहे. प्रज्ञाकडे पैसे किंवा प्रवासाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने कुटुंबीयांनी घातपाताची भीती व्यक्त केली आहे.

तपासात सीसीटीव्हीचा अडथळा

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुडकी आणि मुजफ्फरनगर या दोन्ही महत्त्वाच्या स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे खराब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रज्ञा ट्रेनमधून नेमकी कुठे उतरली किंवा तिला कोणी उतरवले, याचे कोणतेही फुटेज पोलिसांना मिळालेले नाही. पोलिसांनी रेल्वे ट्रॅक, पूल आणि आसपासच्या भागात शोधमोहीम राबवली, पण तिथेही काहीही संशयास्पद आढळले नाही.

कट की अपघात? पोलीसही चक्रावले

पोलिसांनी प्रज्ञाचे कॉल डिटेल्स, व्हॉट्सॲप चॅट्स आणि मेसेज तपासले आहेत. मात्र, त्यात कोणताही संशयास्पद नंबर किंवा बोलणे आढळलेले नाही. प्रज्ञा आणि मनीषमध्ये कोणतेही भांडण झाले नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे कोणतीही तांत्रिक पुरावा किंवा साक्षीदार नसल्याने ही बेपत्ता होण्याची घटना पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

पतीची मुख्यमंत्र्यांना साद
“माझं जग उध्वस्त झालं आहे, प्रज्ञा कुठे आणि कोणत्या परिस्थितीत असेल या विचारानेच अंगावर काटा येत आहे,” अशा शब्दांत मनीषने आपली व्यथा मांडली आहे. मनीष आणि प्रज्ञाच्या कुटुंबीयांनी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रज्ञाचा शोध घेण्याची कळकळीची विनंती केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close