फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या


घरी आलेल्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या मानहानीमुळे वृद्ध शेतकऱ्याने घेतले विष
पालोद / विशेष प्रतिनिधी
स्मॉल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्ज परतीसाठी लावलेल्या तगादया मुळे झालेल्या मानहानीचा एका वृद्ध शेतकऱ्यावर इतका मोठा परिणाम पडला की त्याने शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. बाबूराव खुशालराव वराडे (८४) अवे शेतकऱ्याचे नाव असून ते सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील रहिवासी होते.याबाबत जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, बाबूराव वराडे यांचे पुत्र अजिनाथ वराडे यांनी शेती व घरगुती गरजांसाठी १३ लाख ९३ हजार ९२३ रुपये ५३ पैशांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित फायनान्स संस्थेकडून वारंवार तगादा, धमक्या, शिवीगाळ तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जुलै २०२६ रोजी सरफेसी कायद्यांतर्गत वराडे कुटुंबाच्या गहाण मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असतानाही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांच्या परिस्थितीची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. या कारवाईमुळे बाबूराव वराडे यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचेही त्यांनी नमूद केले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, जप्तीची कारवाई झाल्यानंतर काही वेळातच बाबूराव वराडे यांनी शेतात जाऊन विषप्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ३ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घर जप्त झाल्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेने असा दावाही केला आहे की, संबंधित कर्ज अजिनाथ वराडे यांच्या नावावर असताना जप्तीची कारवाई बाबूराव वराडे यांच्या नावावरील घरावर करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई चुकीची असून याच कारवाईमुळे वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, बाबूराव वराडे यांच्या निधनानंतर अंत्यविधी कुठे करायचा, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर निर्माण झाला होता. यासंदर्भात शेतकरी संघटना, ग्रामस्थ, पोलिस प्रशासन आणि संबंधित बँक व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मानवतेचा दृष्टिकोन ठेवत बँकेने जप्त केलेल्या घराचा तात्पुरता ताबा आणि चाव्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्या. अंत्यविधी व उत्तरकार्य पूर्ण झाल्यानंतर चाव्या पुन्हा बँकेकडे सुपूर्द कराव्यात किंवा थकीत कर्जाबाबत कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा, असे बँकेने दिलेल्या पत्रात नमूद केल्याची माहिती देण्यात आली.
मंगळवारी रात्री सारोळा येथे शोकाकुल वातावरणात बाबूराव वराडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक, शेतकरी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



