पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले आणि मंदिरात झालेल्या प्रेम विवाहाचा फुगा फुटला

कराड /प्रतिनिधि
निर्भया पथक येथील बस स्टँड वर गस्त करत असताना त्यांच्या नजरेत दोन मुली आणि दोन मुले पडली. त्याची विचित्र हालचाल पाहून या पथकाला संशय आला. त्यांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा या चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाचा संशय आणखी बळावला. त्यांनी सक्तीने विचारपूस करताच या कथित प्रेम विवाहाचा भांडाफोड झाला.
निर्भया पथकाच्या सतर्क गस्तीमुळे काही तासांपूर्वीच झालेल्या या ‘प्रेमविवाह’चा भांडाफोड झाला आणि दोन तासांतच या सगळ्या कथेला अनपेक्षित पूर्णविराम मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील येथील दोन युवक दोन मुलींना सोबत घेऊन दोन दिवसांपूर्वी कराडमध्ये आले होते. देवगडहून निघाल्यानंतरत्यांनी प्रथम कोल्हापूर येथे थांबा घेतला. त्यानंतर पुणे, पुढे म्हसवड मार्गे प्रवास करत अखेर कराडमध्ये दाखल झाले होते.
पोलिसांची चाणाक्ष नजर गेली म्हणूनच….
पोलिसदरम्यान, काही तासांपूर्वीच मंदिरात हारांची देवाणघेवाण करून सुरू झालेली ही प्रेमकथा” कराड बसस्थानकात पोलिसांच्या सतर्कतेसमोर थांबली.
एकमेकांना हार घालून झाला कथित विवाह
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत त्यांनी बुधवारी सकाळी एका मंदिरात कोणताही विधी न करता, केवळ एकमेकांना हार घालून प्रेमविवाह झाल्याचा समज करून घेतला. त्यांच्या कथित लग्नानंतर पुढील ठिकाणी जाण्यासाठी ते कराड बसस्थानक परिसरात थांबले होते. दरम्यान, कराड बसस्थानक परिसरात गस्त घालत असलेल्या निर्भया पथकाच्या पोलिसांनी या चौघांकडे संशयाने पाहिले. निर्भया पथकाचे पोलीस पुष्पा चव्हाण, हर्षल साळुंखे आणि संजय थोरात यांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली; मात्र पुढील चौकशीत प्रेमविवाहासाठी घरातून पळून आलो अशी कबुली यावेळी दिली.
प्रेमी जोडप्याकडे पोलिसांकडून विचारपूस
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पोलीस उपधीक्षक राजश्री पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार देवगड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला, तपासात या दोन्ही मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी आधीच नोंद झालेल्या असल्याचे समोर आले. यानंतर चौघांनाही उपधीक्षक पाटील यांच्या दालनात आणून सखोल चौकशी करण्यात आली. त्यांनी देवगडहून कसा पळ काढला, कराडमध्ये कसे आले आणि विवाहाचा निर्णय कसा घेतला याचा उलगडा झाला. दरम्यान, देवगड पोलीस व मुलींचे नातेवाईक कराडमध्ये दाखल झाले, संध्याकाळी दोन्ही मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले. कराड पोलिसांनी मुला-मुलींचे जबाब नोंदवले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.




