जरांगे पाटील यांनी दिला पहिला उमेदवार
पुणे / नवप्रहार डेस्क
ह्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी मराठा समाज उमेदवार देईल असे जरांगे पाटील बोलते होते. त्या अनुरूप त्यांनी पर्वती मतदार संघातून सचिन तावरे यांना उमेदवारी दिली आहे. सचिन तावरे यांनी पुण्यातील पर्वती मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना संविधानाचा मान राखत आणि “एक मराठा, लाख मराठा” च्या जयघोषासह शक्ती प्रदर्शन केले.
तावरे यांची उमेदवारी ही पर्वती मतदारसंघातील मराठा समाजासाठी एक नवी संधी म्हणून पाहिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते असलेल्या सचिन तावरे यांनी पक्षात उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी लढा देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. पर्वतीमध्ये एक लाख 30 हजार मराठा मतदार आहेत.
मनोज जरांगे यांची मोर्चेबांधणी-
तावरे यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने मनोज जरांगे यांनी पर्वतीमध्ये दोन सभांचे आयोजन केले आहे. बिबेवाडी आणि हिंगणे परिसरात या सभा होणार असून, या सभांमध्ये जरांगे तावरे यांच्या प्रचारासाठी व मराठा समाजाच्या हक्कांसाठी मतदारांशी संवाद साधतील. या प्रचार सभांतून जरांगे मराठा समाजाच्या मुद्द्यांना वाचा फोडून त्यांचा हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणार आहेत.
पर्वती मतदारसंघातील भाजप विरुद्धचा संघर्ष
२००९ पासून पर्वती मतदारसंघात भाजपचे वर्चस्व कायम आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, सचिन तावरे यांची उमेदवारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते. मराठा समाजाच्या मोठ्या संख्येबळामुळे मतदारसंघातील मतदानात बदल होण्याची शक्यता आहे. तावरे यांनी “पर्वतीचा विकास हा आमचा मूळ मुद्दा आहे” असे सांगत मतदारांना विश्वास दिला आहे.
मराठा समाजाच्या उभारणीसाठी नवा प्रारंभ
सचिन तावरे यांच्या उमेदवारीने मराठा समाजाच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी एक नवा मार्ग मोकळा केला आहे. मनोज जरांगे यांचे नेतृत्व आणि तावरे यांचा उमेदवारीचा निर्णय एकत्र येऊन पर्वतीत ‘मराठा शक्ती’चे नवीन पर्व उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पर्वतीत भाजपच्या पारंपरिक वर्चस्वाला आव्हान देण्याचा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा समाजाचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.