विदेश

गँगवॉर मध्ये झुबैर बलोच गंभीर जखमी 

Spread the love

कराची / नवप्रहार डेस्क 

                     पाकिस्तान मध्ये गँगवॉर  कुख्यात गँगस्टर  उझेर बलोच चा भाऊ झुबैर बलोच वर गोळीबार झाला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे.

मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी केला गोळीबार

कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ल्यारी परिसरातील मिर्झा आदम खान रोड येथे झालेल्या गोळीबारात किमान तीन जण जखमी झाले. जखमींपैकी एक व्यक्ती झुबैर बलोच असण्याची शक्यता आहे. तो बंदी घालण्यात आलेल्या पीपल्स अमन कमिटी (PAC) या संघटनेचा प्रमुख असलेल्या उझैर बलोचचा भाऊ असल्याचे मानले जाते. मात्र त्याच्या ओळखीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही, असे दक्षिण विभागाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (DIG) यांनी सांगितले.

चेहरा झाकून आले, गोळीबार करून पळाले

पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राच्या अहवालानुसार मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी आपले चेहरे झाकले होते. गोळीबारानंतर एका दुकानदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने हल्लेखोर तेथून पळून गेले. वरिष्ठ पोलीस अधिकारी सय्यद असद रझा यांनी सांगितले की, गोळीबार झाला तेव्हा झुबैर बलोच आपल्या घराबाहेर उभा होता.

‘धुरंधर’ चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत

2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय स्पाय-थ्रिलर ‘धुरंधर’ या चित्रपटात अभिनेता दानिश पंडोर यांनी उझैर बलोचची भूमिका साकारली होती. तर उझैरचा गुरू मानला जाणारा रहमान डाकैत याची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना यांनी साकारली होती. या चित्रपटामुळे कराचीतील ल्यारी गँगवॉर पुन्हा चर्चेत आला होता आणि आता प्रत्यक्षात झालेल्या या हल्ल्यामुळे त्या संघर्षाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

झुबैर बलोच यापूर्वीही अटकेत

झुबैर बलोचला 2012 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी जानेवारीमध्ये त्याची सुटका झाली होती. सध्या पोलीस या हल्ल्याचा अनेक अंगांनी तपास करत आहेत. गँगमधील अंतर्गत वाद, जुन्या शत्रुत्वाचा बदला किंवा वैयक्तिक वैर अशा विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.

पुन्हा गँगवॉर भडकण्याची भीती

झुबैर बलोचवरील हल्ल्यानंतर ल्यारी परिसरात पुन्हा एकदा गँगवॉर सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक झुबैरची प्रकृती कशी आहे, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कराची पोलिसांनी अद्याप या हल्ल्याबाबत सविस्तर भूमिका जाहीर केलेली नाही.

राजकीय पक्षात प्रवेश केल्याची माहिती

काही महिन्यांपूर्वी झुबैर बलोच एका राजकीय पक्षात सामील झाला होता. त्याने परिसरात त्या पक्षाचे झेंडेही लावले होते, असे ल्यारीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने डॉनला सांगितले. ‘कराची ऑपरेशन’ नंतर दुबई आणि इराणमध्ये पळून गेलेले काही गँगस्टर अमेरिका-इराण युद्धानंतर पुन्हा कराचीत परतल्याच्या अफवा सध्या पसरत आहेत.

कराचीच्या ल्यारी गँगची रक्तरंजित कहाणी

कराचीतील ल्यारी गँगचा इतिहास हा अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी, राजकीय संरक्षण आणि रक्तरंजित गँगवॉरने भरलेला आहे. 1960 ते 1980 च्या दशकात काला नाग, दादल (रहमान डाकैतचा वडील) आणि शेरू यांसारख्या गँगस्टरांनी अमली पदार्थांच्या व्यवसायावर वर्चस्व मिळवले होते. पुढे हाजी लालू आणि बाबू डाकैत यांचा उदय झाला. दादलच्या हत्येनंतर त्याचा मुलगा अब्दुर्रहमान बलोच उर्फ रहमान डाकैत गँगचा प्रमुख बनला आणि कराचीतील सर्वात प्रभावशाली डॉन म्हणून ओळखला जाऊ लागला.

अरशद पप्पूसोबत रक्तरंजित संघर्ष

हाजी लालूचा मुलगा अरशद पप्पू याच्याशी झालेल्या वैरातून 2003 पासून भीषण गँगवॉर सुरू झाला. 2008 मध्ये रहमान डाकैतने पीपल्स अमन कमिटी (PAC)ची स्थापना केली. पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP)च्या राजकीय संरक्षणाखाली या संघटनेने ल्यारी परिसरात मोठा प्रभाव निर्माण केला.

रहमानच्या मृत्यूनंतर उझैरचा उदय

ऑगस्ट 2009 मध्ये पोलिस चकमकीत रहमान डाकैत ठार झाला. त्यानंतर त्याचा चुलत भाऊ उझैर बलोच याने गँगची सूत्रे आपल्या हाती घेतली. 2013 मध्ये उझैर बलोचवर अरशद पप्पूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप झाला. त्यानंतर गँगवरील वर्चस्वासाठी त्याचे इतर गुन्हेगारी गटांशीही संघर्ष सुरू झाले.

अखेरीस कराचीमध्ये रेंजर्सनी मोठे अभियान राबवल्यानंतर उझैर बलोचला अटक करण्यात आली आणि त्याच्या गँगची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. मात्र झुबैर बलोचवरील ताज्या हल्ल्यामुळे ल्यारीतील जुना गँगवॉर पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close