पोलिस विभागात खळबळ….. 18 पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

पुणे / विशेष प्रतिनिधी
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलीस कोठडीत मारहाण करणे, अल्पवयीन बालकांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून त्यांची सार्वजनिक धिंड काढणे, लाऊडस्पीकरवरून बदनामी करणे आणि खोटे दस्तऐवज तयार करणे अशा गंभीर प्रकारांनंतर महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशावरून तब्बल 18 पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपींना ५ जुलै २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले होते. या दरम्यान आरोपींना पोलीस ठाण्यात तसेच ७ जुलै २०२६ रोजी लेक टाऊन जवळील एसआरए कॉलनीच्या पार्किंग भागात काठ्या आणि लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तसेच आरोपींना भररस्त्यात गुडघ्यावर बसवून आणि हात पुढे करायला लावून सार्वजनिकरीत्या अपमानास्पद वागणूक दिल्याचे तसेच नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याचे तपासात व व्हिडिओ क्लिपद्वारे उघडकीस आले आहे.
तर,दुसऱ्या घटनेत अल्पवयीन बालकांना बेकायदेशीर कोठडी, मारहाण आणि वाहनाच्या बोनेटला बांधून धिंड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. २० जुलै २०२६ रोजी आंबेगाव पठार पोलीस चौकी येथून १ ते ४ बालकांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आले होते. बाल न्याय मंडळासमोर वेळेत हजर न करता त्यांना २४ तासांपेक्षा जास्त वेळ बेकायदेशीर कोठडीत ठेवून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
तसेच २१ जुलै २०२६ रोजी या अल्पवयीन बालकांना शासकीय पोलीस वाहनाच्या (MH 12 YX 6319) बोनेटला दोरखंडाने बांधून, रस्त्यावरून पायी चालवून त्यांची सार्वजनिकरीत्या अपमानकारक धिंड काढण्यात आली. लाऊडस्पीकरवरून त्यांची ओळख उघड करून बदनामी करण्यात आली, तसेच अनुसूचित जातीच्या बालकांचा जातीय अपमान व मानहानी करण्यात आली. एवढेच नव्हे तर बाल न्याय मंडळाची दिशाभूल करण्यासाठी खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.
मानवी हक्क आयोगाची दखल
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने या दोन्ही प्रकरणाची गंभीर दखल घेत यावरील याचिकेवर सुनावणी घेत पोलीस महासंचालकांना चौकशीचे निर्देश दिले होते. त्या आधारे गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे यांनी केलेल्या तपासात आणि मानवी हक्क आयोगाच्या अहवालानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून गैरवर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल झालेले पोलीस कर्मचारी पुढील प्रमाणे
1. मानसिंग पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
2. गणेश मोहिते (सपोनि)
3. स्नेहल थोरात (सपोनि)
4. निलेश राजेंद्र मोकाशी (पोउनि)
5. सुनिल दादा हनवते (पोलिस हवालदार)
6. दिनेश टामके (पोलिस हवालदार)
7. नितेश दत्तात्रय चोरमोले (पोलीस अंमलदार)
8. सागर चंद्रकांत बोरगे (पोलीस अंमलदार)
9. सोहम कैलास शेडकर (पोलीस अंमलदार)
10. मंगेश पवार (पोलीस अंमलदार)
11. सुवर्णा दत्तात्रय भिसे (पोलीस अंमलदार)
12. आप्पा मधुकर दराडे (पोउनि)
13. राहुल अशोक ओव्हाळ (पोलीस अंमलदार)
14. रविंद्र शंकर गायकवाड (पोलीस अंमलदार)
15. संदीप लक्ष्मण आगळे (पोलीस अंमलदार)
16. फकीर (पोउनि)
17. सुतार (पोलीस अंमलदार)
18. पवार (पोलीस अंमलदार)
दरम्यान संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११५(२) (इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे), १२७(२), १२७(३) (गैरनिरोध), १३१, ३५२, ३५१(२) आणि १९८, १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे.




