अवैध गर्भपात केंद्रावर छापा ; चार लोकांना अटक

बीड / नवप्रहार मीडिया
लिंगनिदान चाचणी किंवा गर्भपात हा कायद्याने गुन्हा असला तरी मुलगाच पाहिजे या नादाखली अनेक महिला लिंगनिदान करवून घेतात. तर वर्तमान काळात तरुण तरुणी वर पाश्चात्य जीवनशैलीचा परिणाम पडल्याने आणि लग्नापूर्वीच ते लिव्ह इन मध्ये राहत असल्याने मनात नसतांना देखील तरुणी गर्भवती होतात. अश्या वेळेस त्यांच्याकडे गर्भपाताशिवाय दुसरा कुठला ईलाज नसतो. याच कारणांमुळे अवैध गर्भपात केंद्र सुरू आहेत. अश्याच एका गर्भपात केंद्रावर बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे यांनी धाड टाकत चार लोकांना पकडले आहे.
भरारी पथकाने गुरुवारी सकाळी 6 वाजता ही धडक कारवाई केली. कारवाईत एक सोनोग्राफी मशीन आणि चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई शहरातील संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा वैधकीय अधिक्षकांकडे मिळाली होती. तक्रारीनुसार, डॉ. अशोक बडे यांनी सापळा रचून मोठ्या अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला. डमी महिला रुग्ण तयार करून खातीरजमा करण्यात आली. कारवाईसाठी गुरुवारचा दिवस निश्चित करण्यात आला. सकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकून एक महिला, घरमालक आणि त्यांना मदत करणारे दोन अशा चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. घटना स्थळावरून एक सोनाग्राफी मशीन व गर्भपात करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आरोपीवर यापूर्वीही झाली होती कारवाई
आरोपी महिलेचे नाव मनीषा सानप असे असून ती परिचारिका आहे. तिच्यावर काही महिन्यांपूर्वी कारवाई झाली होती. तिला अशाच एका गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली होती. मात्र, ती जामिनावर सुटताच तिने पुन्हा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीचं पुन्हा धाडस कसं झालं…
आरोपी मनीषा सानप हिच्याविरुद्ध गंभीर खटका सुरू असताना पुन्हा अवैध गर्भपात केंद्र सुरू करण्याचे तिचं धाडस कसं झालं. तिला कोण्या बड्या व्यक्तीचे पाठपळ मिळत असावे का, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी आरोपी महिलेसह तिला मदत करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.
बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनी सुरेखा धस विधी अधीक्षक मोहम्मद नोमानी, डॉ.रांदड, डॉ.राजेश शिंदे यांच्या मदतीने ही कारवाई केली.