सामाजिक

गाडी धुतांना बिबट्याचा युवकावर हल्ला, बादलीने केला प्रतिकार

Spread the love

मंचर / विशेष प्रतिनिधी 

                 गाडी धूत असताना मागील बाजूने आलेल्या बिबट्याने तरुणावर हल्ला केला.पण तरुणाने हातातील बादलीने प्रतिकार करत स्वतःचे रक्षण केले. घटना श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील मानकरखंडी वस्तीवर पहाटेच्या सुमारास घडली आहे.  दिनेश सयाजी मानकर असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

विशेष म्हणजे, या वेळी परिसरात एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनेश मानकर हे कामानिमित्त मुंबईहून गावी आले होते. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांना पुन्हा मुंबईला जायचे असल्याने त्यांनी रस्त्यालगत चारचाकी उभी करून गाडी धुण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रस्त्याच्या पश्चिमेला असलेल्या डोंगराच्या बाजूने दोन बिबटे आले. त्यातील एका बिबट्याने रस्ता ओलांडून थेट गाडीजवळ येत मानकर यांच्यावर झडप घातली, तर दुसरा बिबटा काही अंतरावर थांबून होता.

मानकर हे गाडी धुण्यासाठी वाकलेले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी हातातील बादली पुढे धरून प्रतिकार केला. तरीही बिबट्याने त्यांच्या हातावर पंजा मारल्याने ते जखमी झाले. बादलीने प्रतिकार केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. मानकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.

घटनेची माहिती मिळताच मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी मानकर यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, एकाच वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लावला आहे. परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close