थप्पड की गुंज आणि नवऱ्याच्या कृत्याने सगळेच सुन्न

जळगाव / विशेष प्रतिनिधी
त्या दोघात प्रेम विवाह झाला होता. त्यातल्या त्यात मुलीने घरच्यांच्या विरोधात जात स्वतःच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले होते. “माझ्या पसंतीनुसार लग्न नाही केलं तर मी जीव देईन…” असा हट्ट धरून ज्या लेकीने आपल्या प्रेमाखातर घरच्यांच्या विरोधात जाऊन संसार मांडला, त्याच पतीने तिचा घात केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधून समोर आला आहे.
पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच अवघ्या 20 वर्षांच्या तरुण पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची थरकाप उडवणारी घटना यावल शहरात घडली आहे. मृत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात केलेला हंबरडा आणि फोडलेला टाहो बघून उपस्थितांचेही काळीज पिळवटून आलं. या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण
यावलमधील अयेशा नगरात फरदीन खान आरिफ खान आणि त्याची पत्नी मशिराबी फरदीन खान हे तरुण जोडपे राहत होते. मंगळवारी घरात दोघेच असताना त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. या वादाच्या भरात संतापाच्या आहारी गेलेल्या मशिराबीने फरदीनच्या कानशिलात लगावली. एका थडक्याचा आणि अपमानाचा राग मनात धरून संतापलेल्या फरदीनने मशिराबीचा गळा दाबून निर्घृण खून केला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.लेकीच्या मृत्यूनंतर आईने हंबरडा फोडला
हत्येचा हा प्रकार उघडकीस येताच यावल पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत पसार झालेल्या आरोपी फरदीन खानला ताब्यात घेतले. सुरत वरून तातडीने धाव घेतलेली मृत मशिराबीची आई सफीयाबी सय्यद अक्रम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लेकीच्या मृत्यूनंतर आईने पोलिस ठाण्यात फोडलेला हंबरडा आणि या घटनेमुळे संपूर्ण यावल शहरात पसरलेली सुन्न शांतता मनाला सुन्न करणारी आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद करत आहेत.




