आणखी एक पेपर फूट प्रकरण ६० लाखात मिळाला गट ‘ ब ‘ चा पेपर

दुय्यम निबंधक एसआयटी च्या रडारवर
शिवाजीनगर / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आता संयुक्त गट ‘ब’ २०२५ परीक्षेचा पेपरही फुटल्याचे उघड झाले आहे. संयुक्त गट ‘ब’ परीक्षेत विजय किंगर या विद्यार्थ्याला तब्बल ९० इतके अत्युच्य गुण मिळाले असून, त्याला ६० लाखांत गट ‘ब’ परीक्षेचा पेपर मिळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तसेच ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर ५० लाखांत मिळाला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी किंगरला बुलढाणा येथून अटक करण्यात आली आहे. संबंधित दोन्ही परीक्षेतील आर्थिक व्यवहारातील १० लाखांची रक्कम त्याने परत केली असल्याची कागदपत्रे विद्यार्थ्यांनी उघड केली आहेत.
याबाबत ‘लाेकमत’शी बोलताना ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा फुटीची बाब उघडकीस आणणारे ऋषी गांगर्डे म्हणाले की, गट ‘ब’ परीक्षेत ९० इतके उच्च गुण मिळणे कठीण आहे. विशेषत: किंगर हा संयुक्त गट ‘क’ २०२५ आणि संयुक्त गट ‘ब’ २०२६ परीक्षेत नापास झाला आहे. मात्र दुय्यम निबंधक हे पद असलेल्या गट ‘ब’ २०२५ परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवत उत्तीर्ण झाला आहे. पेपरफुटीचा लाभ घेत ‘एमपीएससी’च्या ड्रग्ज इन्स्पेक्टर या परीक्षेतही अव्वल रँकने उत्तीर्ण झालेल्या किंगरला गट ‘ब’च्या परीक्षेत ९० गुण मिळाले, यावरून हा देखील पेपर फुटला असल्याचा संशय अधिक वाढला आहे.
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पेपर हे आयोगातील अधिकारीच फोडत आहेत. या प्रकरणी आयोगाचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांना पूर्वीच अटक झाली असून, संयुक्त गट ‘ब’ २०२५ च्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावरदेखील लेंडवे यांचीच सही आहे. त्यामुळे आयोगातील पेपर फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या लेंडवे असून, सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते हे गोपनीय विभागाचे अधिकारी म्हणून काम करत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. एमपीएससीचे बहुतांश पेपर फुटले असल्याचा संशय आहे.
अभय वाघ हेच मास्टरमाईन्ड?
ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपर फुटला, तेव्हा हंगामी अध्यक्ष डॉ. अभय वाघ होते. संयुक्त गट ‘ब’ २०२५ च्या परीक्षेच्या वेळी देखील हंगामी अध्यक्ष अभय वाघच होते. आयोगाचे तत्कालीन हंगामी अध्यक्ष वाघ तसेच विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार आणि इतर सदस्य यांच्या काळातील सर्वच परीक्षांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे केलेली आहे. अनेक परीक्षांच्या मुलाखती मॅनेज करणे, काही विद्यार्थ्यांना मुलाखतीत अवाजवी मार्क्स देणे अशी वाघ यांची वादग्रस्त कारकीर्द राहिलेली आहे.
वादग्रस्त कारकीर्द आणि आयोगातील गोपनीयतेचा भंग
डॉ. अभय वाघ यांचा हंगामी अध्यक्ष असतानाच्या काळातील जवळपास सर्वच परीक्षा आणि त्यांचा ज्या सरळसेवेच्या परीक्षेच्या मुलाखती पॅनलमध्ये प्रमुख म्हणून समावेश होता. अशा सर्वच परीक्षा या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. लोकसेवा आयोगातील पेपर लीक कांड प्रकरणात अभय वाघ यांनी आयोगाची गोपनीयता भंग करून अक्षरशः लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चुराडा केलेला आहे. त्यामुळे निष्पक्ष चाैकशीतून सत्य बाहेर आले पाहिजे, हीच विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे.
परीक्षा न देताच केले उत्तीर्ण
गोपनीय कक्षाचे सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्या मेव्हण्याला कोणतीही परीक्षा न देता गट ‘ब’ची परीक्षा पास करून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासोबत अजून आठ लोकांना गट ‘ब’ पूर्वचा पेपर दिला आहे. त्यामुळे ही साखळी अजून मोठी असून, यामध्ये किती लोकांना हा पेपर दिला गेला आहे, याची एसआयटी चौकशी करत आहे.
दुय्यम निबंधक एसआयटीच्या रडारवर
गट ‘ब’ परीक्षेतील दुय्यम निबंधक आता एसआयटीच्या रडारवर आल्याची माहिती देखील पुढे येत आहे. खेळाडू कोट्यातील ‘कट ऑफ’ २६ लागला तर काही लोकांना ‘७२’ गुण मिळाले आहेत. या परीक्षेत इतके गुण मिळवणे कठीण आहे, त्यामुळे खेळाडू कोट्यातून पद मिळवलेले तसेच इतर असे एकूण ६१ दुय्यम निबंधक (एसआर) ‘एसआयटी’च्या रडारवर आलेले आहेत.

