घरात घडलेल्या त्या घटनेमुळे प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अडचणीत

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
नवीदिल्लीत घडलेल्या एका घटनेने खळबळ माजली आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर च्या घरात जबरदस्तीने घुसलेल्या अभिनव नावाचा तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी इन्फ्लुएन्सर चे वडील आणि शेजाऱ्यांना अटक केली आहे.
दिल्लीतील मधू विहार परिसरात ७ नोव्हेंबर रोजी एक तरुण जबरदस्तीने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा बिष्टच्या घरात घुसला. अभिनव असं या तरुणाचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील रहिवासी होता. चेन्नईतील एका खासगी कंपनीत काम करत होता. घरात घुसून त्याने नेहाशी लग्न करण्याचा हट्ट केला. एफआयआरनुसार, त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता.
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून मारहाण
अभिनवच्या या कृत्यामुळे संतापलेल्या नेहाच्या कुटुंबीयांनी आणि काही शेजाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना अभिनवच्या पाठीवर आणि उजव्या पायावर गंभीर दुखापत झाल्याचं आढळून आलं. त्याला राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र १५ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एकतर्फी प्रेमातून उचललं पाऊल
पोलीस तपासात समोर आलं की, अभिनव गेल्या अनेक दिवसांपासून नेहा बिष्टचे सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहत होता आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. काही महिन्यांपूर्वीही तो फॅन म्हणून नेहाच्या घरी आला होता. नेहाच्या इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सध्या तिच्या साखरपुड्याचे व्हिडिओ शेअर करत होती. नेहाचं लग्न ठरल्यामुळे अभिनव अस्वस्थ होता, पण नेहा त्याला ओळखतही नव्हती.
वडील आणि शेजाऱ्याला अटक
अभिनवच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात नेहाचे वडील वीरेंद्र बिष्ट आणि एका शेजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मारहाणीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. या प्रकरणातील इतर बाबींचाही तपास सुरू आहे.




