सस्पेन्स वाढले ; पडद्यामागे सुरू आहेत हालचाली ?

वॉशिंग्टन/तेहरान: गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणाऱ्या मध्यपूर्वेतील महासंकटाला अचानक एक अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जगभरातील गॅस आणि इंधनाचा पुरवठा धोक्यात आणणाऱ्या दोन कट्टर शत्रू देशांमध्ये पडद्यामागे अत्यंत गुप्त हालचाली सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर महाभूकंप घडवून आणू शकणाऱ्या या संभाव्य करारामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता जागतिक महासत्तेच्या अंतिम भूमिकेकडे लागले आहे. एका बाजूला शांततेची प्राथमिक चर्चा आणि दुसरीकडे युद्धभूमीवरील भीषण रक्तपात अशा दुहेरी तणावातून जागतिक राजकारणाला एक नवी दिशा देणारी ही अत्यंत मोठी अपडेट आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात 60 दिवसांच्या युद्धविराम करारावर सहमती झाल्याचा मोठा दावा समोर आला आहे. एक्सिओसच्या रिपोर्टनुसार या कराराला आता फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.
दोन्ही देशांमध्ये मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (MoU) वर प्राथमिक सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. या कराराचा मुख्य उद्देश संघर्षविरामाचा कालावधी वाढवणे आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर औपचारिक चर्चा सुरू करणे हा आहे. रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारावर अंतिम निर्णय घेण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला आहे. दुसरीकडे इराणनेही या कराराबाबत अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.
होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक सुरू राहणार
प्रस्तावित करारानुसार होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील. इराणला पुढील 30 दिवसांत समुद्रात पेरण्यात आलेल्या माईन्स हटवाव्या लागतील आणि जहाजांकडून कोणताही टोल आकारला जाणार नाही. त्याच्या बदल्यात अमेरिका टप्प्याटप्प्याने आपली नौदल नाकेबंदी हटवण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इराणला तेल विक्रीवरील काही निर्बंधांमध्ये सवलत देण्याबाबतही चर्चा होणार आहे.
या करारामध्ये इराणने अण्वस्त्र विकसित न करण्याचे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले आहे. सुरुवातीच्या 60 दिवसांत उच्च स्तरावरील समृद्ध युरेनियम आणि युरेनियम संवर्धनावर चर्चा होणार आहे.
5 मोठे अपडेट्स
इराण-अमेरिका डीलचा दावा
इराणने दावा केला आहे की अमेरिकेसोबत युद्ध संपवण्यासाठी प्राथमिक कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. यात होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक पुन्हा सुरू करणे आणि अमेरिकन सैन्याची उपस्थिती कमी करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे.
अमेरिकेने रिपोर्ट फेटाळला
व्हाईट हाऊसने इराणी माध्यमांमध्ये आलेल्या शांतता कराराच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. अमेरिका म्हणाली की दोन्ही देशांमध्ये कोणताही अधिकृत मसुदा तयार झालेला नाही.
लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ले वाढले
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 31 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. सततच्या बॉम्बहल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू आहे.
इराणने भारतीय खलाशांची सुटका केली
दीर्घ राजनैतिक प्रयत्नांनंतर इराणने जुलै 2025 पासून ताब्यात ठेवलेल्या 10 भारतीय खलाशांची सुटका केली आहे. सर्व खलाशी सुरक्षित असून ते लवकरच भारतात परतणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हमास कमांडर ठार केल्याचा इस्रायलचा दावा
इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ल्यात हमासच्या लष्करी शाखेचा नवा कमांडर मोहम्मद ओदेह ठार झाल्याचा दावा केला आहे. गाझा सिटीतील एका निवासी इमारतीवर अनेक महिन्यांच्या देखरेखीनंतर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
होर्मुझचा वापर शत्रूंना करू देणार नाही
इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर आपल्या विरोधात कोणत्याही लष्करी कारवाईसाठी होऊ दिला जाणार नाही. संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर-सईद इरावानी यांनी सांगितले की होर्मुझ सामुद्रधुनी ही इराणच्या सुरक्षेशी आणि राष्ट्रीय हितांशी संबंधित अत्यंत महत्त्वाची समुद्री वाहतूक मार्गिका आहे. ते म्हणाले, इराण आपल्या विरोधात शत्रुत्वपूर्ण किंवा लष्करी कारवायांसाठी या मार्गाचा वापर होऊ देणार नाही. इरावानी यांनी अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांवर टीका करत इराणची भूमिका पूर्णपणे कायदेशीर असल्याचेही म्हटले आहे.




