अपघात

धरणाच्या पाण्याकडे बोट दाखवून रडणाऱ्या चिमुकलीचा निर्देश तिला समजला पण ती होती हतबल 

Spread the love
तिने आरडाओरड केली , कुस्ती स्पर्धा सोडून तरुण धावले मदतीला
 
पण चार लोकांनी गमावला जीव, चिमुकलीच्या वडिलांचा आणि गरोदर आईचा समावेश

 
प्रतिनिधी, नाशिक :
             दोन वर्षाची ती चिमुकली धरणाच्या पाण्याकडे बोट दाखवून मम्मी ,पप्पा म्हणून रडत होती. इतक्यात तेथून जाणाऱ्या संगीता घाडगे या महिलेची नजर तिच्यावर पडली.ती चिमुकली पाण्याच्या दिशेने निघाली प्रसंगाची गंभीरता ओळखून संगीताने चिमुकलीला कडेवर घेतले. आणि तलावाच्या दिशेने बघितले असता तिला बाहेर अस्ताव्यस्त पडलेल्या चपला आणि कपडे दिसले. क्षणार्धात संगीताला गांभीर्य कळले. तिने आरडाओरड सुरू केली.तिचा आवाज ऐकून कुस्ती स्पर्धा सुरू असल्याने तरुण धावत आले.पण तोंपर्यंत सगळे संपले होते.

मुलांचा छोटासा हट्ट पुरवणं अंगलट

उन्हाळ्याची सुट्टी… बच्चेकंपनीचा कल्लोळ… आणि धरणाच्या संथ पाण्याचा विलोभनीय देखावा… अशा आल्हाददायक वातावरणात घराशेजारच्या मुलांचा छोटासा हट्ट पुरविणे संगमनेरच्या ठोंबरे दाम्पत्यासाठी आणि मखमलाबादच्या पवार कुटुंबातील सख्ख्या भावांसाठी अखेरचा प्रवास ठरेल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. सिव्हिल इंजिनीअर असलेले सचिन कैलास ठोंबरे (वय ३२, मूळ रा.
पिंपरणे, ठोंबरे वस्ती, संगमनेर) काही महिन्यांपासून कामानिमित्त मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंदनगरात पत्नी रोहिणी आणि दोन वर्षांच्या मुलीसह वास्तव्यास होते.

मंगळवारी सुट्टी असल्याने सचिन यांनी कश्यपी धरणावर फिरण्याचा बेत आखला. ते कारने निघत असतानाच शेजारी राहणारे आणि मूळचे दिंडोरीतील असलेले पवार कुटुंबातील केतन अनिल पवार (१६) आणि कौशल अनिल पवार (१४) या भावंडांनीही सोबत येण्याचा हट्ट धरला. दुपारी दोन वाजता आनंदाने निघालेले हे पाचही जण कश्यपी धरणावर पोहोचले, तेव्हा तिथल्या निसर्गरम्य वातावरणात ते हरखून गेले. मात्र, हा आनंद काही क्षणांचाच ठरला.

अन् आनंदाचा क्षण बनला काळ !

धरणाच्या काठावर फिरत असताना सचिन आणि दहावीत शिकणाऱ्या केतनला पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र पाण्याचा आणि खाली असलेल्या धोकादायक गाळाचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून काठावर उभी असलेली सचिन यांची गरोदर पत्नी रोहिणी आणि दहावीत शिक्षणाऱ्या केतन यांनी कसलाही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. परंतु, काळाने या सर्वांवर झडप घातली.

त्या’ चिमुकलीचा टाहो आणि ‘देवदूत’ संगीता

मम्मी… पप्पा…’ असे म्हणत धरणाच्या अथांग पाण्याकडे बोट दाखवून रडणारी ती दोन वर्षाची बालिका आणि काठावर अस्ताव्यस्त पडलेले चपलांचे जोड… हेच त्या भीषण दुर्घटनेची साक्ष देत होते. चारही जण पाण्यात बुडत असताना ती निष्पाप चिमुकलीही काठावरून पाण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी संगीता घाडगे ही वाटसरू महिला तिथे देवदू‌तासारखी धावून आली. त्यांनी प्रसंगावधान राखून बाळाला कडेवर घेतले. बाळ सारखे पाण्यात बोट दाखवून रडत असल्याने संगीता यांना काहीतरी विपरित घडल्याचा संशय आला आणि त्यांनी तातडीने आरडाओरडा केला.

कुस्ती स्पर्धा सोडत तरुण धावले मदतीला

दुर्घटनेची माहिती मिळताच धोंडेगाव येथील तरुणांनी तिथे सुरू असलेली कुस्तीची स्पर्धा अर्धवट सोडून धरणाकडे धाव घेतली. जिवाची पर्वा न करता तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि शोधमोहीम राबवून चौघांचेही शव बाहेर काढले. हरसूल पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, नाकातोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरल्याने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close