विदेश

हिंदू मंदिराला टार्गेट करत  गोळीबार करण्याचा कट उघड 

Spread the love
 
 
रायफल चा ट्रिगर अडकल्याने मोठा अनर्थ टळला 
 
सहकाऱ्याने दिलेल्या माहिती मुळे रक्तपात थांबला 
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
 
शिकागो / नवप्रहार डेस्क 

 

अमेरिकेच्या शिकागो शहरातून एक हादरवून टाकणारा प्रकार उघड झाला आहे. नवरात्रीच्या पूर्व संध्येला शिकागो शहरापासून ७० किमी लांब अरोरा भागातील हिंदू मंदिरात गोळीबार करण्याचा आरोपीचा प्लान होता.पण ऐनवेळी त्याची रायफल जाम झाल्याने हा मोठा नरसंहार टळला. भाविक याला देवीचा चमत्कार मानत आहेत. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय आणि हिंदू समाजात तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शिकागोजवळील अरोरा येथील हिंदू मंदिरावर हल्ल्याचा कट

स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय संशयिताचे नाव अलेक्झांड्रोस पापोराकिस असे आहे. आरोपीने स्वतःची ओळख ‘श्वेतवर्णीय वर्चस्ववादी’ ) आणि ‘नव-नाझी’ कट्टरपंथी विचारांचा समर्थक म्हणून दिली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून अरोरा परिसरातील हिंदू मंदिरांवर पाळत ठेवून होता. धार्मिक उत्सवाच्या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, हीच संधी साधून जास्तीत जास्त लोकांना लक्ष्य करण्याचा त्याचा भयंकर इरादा होता.

सहकाऱ्याला फोन अन् पोलिसांची धडक कारवाई

हल्ल्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आरोपी अलेक्झांड्रोस घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर रविवारी त्याने एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला मेसेज पाठवून फोन करण्यास सांगितले. फोनवरील संभाषणात त्याने उघड केले की, तो मंदिरात गोळीबार करण्यासाठी गेला होता, परंतु त्याची रायफल चालली नाही. इतकेच नाही तर, ‘हिंदूंना आणि भारतीयांना ठार मारण्याची हीच योग्य वेळ आहे आणि मी आता थांबू शकत नाही,’ अशा हिंसक भावना त्याने व्यक्त केल्या.

त्याच्या सहकाऱ्याने या संभाषणाचे गांभीर्य ओळखून अजिबात विलंब न करता तातडीने माउंट प्रॉस्पेक्ट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सूत्रांचे जाळे विणून पॅलाटाईन येथील आरोपीच्या घराबाहेर सापळा रचला आणि त्याला अटक केली. रोलिंग मेडोज काउंटी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी आरोपीला ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

घराच्या झाडाझडतीत शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

अटक झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता थक्क करणारी माहिती समोर आली. त्याच्या घरातून एक सेमी-ऑटोमॅटिक रायफल, भरलेले मॅगझिन, शेकडो जिवंत काडतुसे आणि बुलेटप्रूफ बॉडी आर्मर जप्त करण्यात आले. या बॉडी आर्मरवर नव-नाझी आणि श्वेतवर्णीय अतिरेकी संघटनांशी संबंधित चिन्हे आणि चित्रे रेखाटलेली होती. पोलीस प्रशासनाने न्यायालयात सांगितले की, ‘या धोक्याचे गांभीर्य अत्यंत स्पष्ट आहे; जर बंदूक अडकली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.’

दरम्यान, न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी आणि स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे भारतीय दूतावासाने कौतुक केले आहे. तसेच, अमेरिका प्रशासनाकडून परिसरातील सर्व हिंदू मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली असून भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close