क्राइम
एकतर्फी प्रेम आणि सुडाच्या भावनेतून घडले हत्याकांड


एक वर्षापूर्वीच्या सुखी संसाराचा भयानक शेवट
सोलापूर / विशेष प्रतिनिधी
रिक्षा चालक सिद्धाराम कैलास कटप याच्या हत्येमागे एकतर्फी प्रेम आणि सुडाची भावना असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. संतोष पाटील हा युवक सिद्धाराम ची पत्नी श्रुती वर एकतर्फी प्रेम करायचा. त्याने श्रुती समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पण श्रुतीने ती सिद्धाराम वर प्रेम करत असून त्याचाशीच लग्न करेल असे संतोष लां सांगितले होते. तेव्हा पासून संतोष सिद्धाराम चा राग करायचा.
एकतर्फी प्रेम आणि सुडाची आग
श्रुतीचे आई-वडील हे कामानिमित्त नाशिक येथे राहण्यास होते. तर श्रुती म्हणजेच सिद्धाराम कैलास कटक यांची पत्नी हे कलावती नगर भागात तिच्या आजीकडे राहायची. जवळच राहणाऱ्या संतोष महादेव पाटील यांनी एका वर्षापूर्वी डिसेंबर 2025 मध्ये श्रुतीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण श्रुतीचं सिद्धारामवर प्रेम होतं. तिने स्पष्ट शब्दांत संतोषला नकार दिला आणि सांगितलं, “माझं सिद्धारामवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार.”
हा नकार संतोषच्या अहंकाराला लागला. त्याने वरवर श्रुतीशी बोलणं बंद केलं, पण मनात सिद्धारामबद्दल द्वेष आणि राग पाळला. पुढे 20 एप्रिल 2025 रोजी कुंभारी येथील नातेवाईकांच्या शेतात श्रुती आणि सिद्धाराम यांचा विवाह झाला. दोघे एकत्र राहू लागले, आणि हाच सुखाचा संसार संतोषच्या डोळ्यात खुपू लागला.
तो गुपित फोन कॉल आणि कट
सिद्धारामचा मित्र रियाज शेख याने 17 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास विशाल आणि संतोष यांच्यातील फोनवरील संभाषण ऐकले की, सिद्धारामला मारायचं आहे, समोरून फोनवर बोलणारा व्यक्ती हा संतोष होता. रियाजने ही माहिती सिद्धारामला देण्यासाठी फोन केला होता पण सिद्धाराम रिक्षा चालवत असल्याने त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्याने सितारामची पत्नी श्रुती यांना फोन केला आणि सगळी माहिती सांगितली. तेव्हा पत्नीने सर्व माहिती आपल्या पतीला दिली. सिद्धारामने आपल्याला मारण्याचा कट का रचला जातोय, याचा जाब विचारण्यासाठी संतोष पाटीलला फोन केला तेव्हा संतोषने भेटण्यासाठी सुनील नगर या ठिकाणी बोलावलं.
रक्ताने माखलेला रस्ता: गळ्यावर वार
रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिद्धारामने विचारलेल्या जाबाने संतोषचा ताबा सुटला. जुना राग आणि नकाराचा सूड त्याच्या डोक्यात हवा बनून शिरला होता. काही समजण्याच्या आतच संतोषने आपल्यासोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि सिद्धारामला पळण्याची संधीही मिळाली नाही.
संतोषने सिद्धारामच्या थेट गळ्यावर आणि पाठीवर धारदार चाकूने सपासप वार केले. गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि सिद्धाराम तिथेच कोसळला. हा थरार पाहून जवळच असलेले प्रमोद पाटील सिद्धारामला वाचवण्यासाठी धावले, पण सुडाने अंध झालेल्या संतोषने त्यांच्यावरही वार केला, ज्यामुळे त्यांच्या उजव्या हातावर गंभीर जखम झाली.
आरोपी संतोष वार केल्यानंतर रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन तिथून पसार झाला. परिसरात एकच आक्रोश आणि खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या सिद्धारामला उपचाराकरिता सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच सिद्धाराम कैलास कटप चा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
पोलिसांची कारवाई आणि शेवट
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सिद्धारामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि जखमी प्रमोद पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत मुख्य आरोपी संतोष महादेव पाटील याला बेड्या ठोकल्या.




