दोन मुलांची आई प्रियकरासोबत रोमान्स करतांना पकडल्या गेली

महिलेचा पती म्हणतो मला तिला ठेवायचे नाही, तर महिला आपल्या दोन मुलांचा त्याग करून प्रियकरासोबत राहण्यास तयार
वैशाली (बिहार ) / विशेष प्रतिनिधी
प्रेमात मनुष्य किती आंधळा होतो हे अनेक प्रकरणावरून समोर आले आहे. एकदा व्यक्ती प्रेमात पडली की मग त्याला / तिला वयाचे अथवा कुठल्याच गोष्टीचे बंधन राहत नाही. प्रेमासाठी महिला / पुरुष परदेशांतून भारतात आल्याचे आपण नेहमीच वाचत असतो. या प्रकरणात देखील दोन मुलांच्या आईची सोशल मीडियावर तरुणाशी ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघे आंब्याच्या बागेत रोमान्स करत असताना गावकऱ्यांनी त्यांना पकडले.आणि मंदिरात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर महिलेच्या पतीला बोलाविण्यात आले. त्याने बायकोला सोबत ठेवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तर महिलेने सुद्धा आपल्या दोन अपत्याचा त्याग करून प्रियकरासोबत राहण्यास सहमती दर्शवली.
पातेपुर येथील रहिवासी असलेल्या खुशी कुमारी हिचे लग्न २०२२ मध्ये राजीव पासवान यांच्याशी झाले होते. त्यांना दोन लहान मुलेही आहेत. मात्र, वर्षभरापूर्वी खुशीची ओळख इन्स्टाग्रामवर परदेशी कुमार नावाच्या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि ही दोन मुलांची आई संसाराचा विसर पडून प्रियकराच्या प्रेमात बुडाली.
बागेत रंगेहात पकडलं अन्…
बुधवारी संध्याकाळी खुशी आणि परदेशी हे पातेपुरमधील एका आमराईत चोरून भेटत होते. दोघेही आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांनाही रंगेहात पकडले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. प्रकरण पोलिसात नेण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी गावकऱ्यांनी एक अजब निर्णय घेतला. त्यांनी या प्रेमी युगुलाला थेट छपकी पोखर येथील मंदिरात नेले आणि तिथेच त्यांचा विवाह लावून दिला.
पतीची रोकठोक भूमिका
या घटनेची माहिती मिळताच खुशीचा पती राजीव तिथे पोहोचला. पत्नीचा हा अवतार पाहून त्याने तिला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. “जर माझ्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबतच राहायचे आहे आणि तो तिला सांभाळायला तयार आहे, तर मला आता तिच्याशी काहीही देणेघेणे नाही,” अशी खंबीर भूमिका राजीवने घेतली. दुसरीकडे, खुशीनेही आपल्या दोन मुलांचा विचार न करता प्रियकरासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.




