३७ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर ने ६ व्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन


यावेळी तिची ६ महिन्यांची मुलगी होती कवेत
तान्हुली आश्चर्यकारक रित्या बचावली
हैदराबाद / विशेष प्रतिनिधी
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील मियापूर परिसरातून एक मन हेलावणारी बातमी समोर येत आहे. येथे एका ३७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने आपल्या सहा महिन्याच्या मुलीला कडेवर घेत हे आत्मघातकी पाऊल उचलले आहे. मात्र, उडी मारल्यानंतर हवेतच बाळ आईच्या हातातून निसटून दूर पडल्याने या चिमुरडीचा जीव आश्चर्यकारकरित्या वाचला आहे.
ही दुर्दैवी घटना मियापूरच्या मयुरी नगरमधील ‘लक्ष्मी प्रेस्टिज अपार्टमेंट’मध्ये घडली आहे. मृत महिलेची ओळख ईशा साहू (वय ३७) अशी झाली असून त्या पेशाने आयटी इंजिनिअर होत्या.
हवेतच बाळ हातातून निसटले…
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ईशा यांनी आपल्या ६ महिन्यांच्या मुलीला छातीशी घट्ट कवटाळले आणि अपार्टमेंटच्या ६ व्या मजल्यावरून खाली उडी घेतली. मात्र, खाली कोसळत असताना हवेच्या वेगामुळे बाळ अचानक आईच्या हातामधून निसटले आणि काही अंतरावर जाऊन पडले. या भीषण घटनेत ईशा यांचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. सुदैवाने चिमुरडीला केवळ किरकोळ दुखापत झाली होती. तिला तातडीने केपीएचबी येथील लोटस रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.
‘इन्सोमनिया’ आणि मानसिक तणावामुळे उचलले पाऊल
ईशा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण आता समोर आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशा या गेल्या काही महिन्यांपासून ‘इन्सोमनिया’ म्हणजेच तीव्र अनिद्रा (झोप न येणे) या आजाराने त्रस्त होत्या. त्यांना रात्री अजिबात झोप येत नव्हती. दीर्घकाळापासून झोप पूर्ण न झाल्यामुळे त्या तीव्र मानसिक तणावाखाली आणि डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. याच नैराश्यातून त्यांनी हे आत्मघाती पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी मियापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या अपार्टमेंटमधील रहिवासी आणि ईशा यांच्या कुटुंबीयांची चौकशी करत असून, घटनेमागील इतर बाजूंचा कसून शोध घेतला जात आहे.




