कार्यालयीन कामकाज आटपून घरी निघालेल्या तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार


कार्यालयीन कामकाज आटपून घरी निघालेल्या तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार
पालघर / प्रतिनिधी
कार्यालयीन कामकाज संपवून घरी परतणाऱ्या 28 वर्षीय तरुणीवर मागून धावत आलेल्या तरुणाने कोयत्याने सपासप वार केल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक तर हल्ला करणारा तरुण कोर्टात शिपाई असल्याचे समजत आहे.या भीषण हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा सर्व थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हल्लेखोर तरुण हा न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. या घटनेमुळे पालघर शहरात भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
घरी जात असताना साधली संधी
स्नेहल सावंत (28) असे जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या मूळच्या सातारा जिल्ह्यातील दहीवडी येथील रहिवासी असून सध्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास स्नेहल या आपले काम आटोपून पालघर शहरातील गोल्ड सिनेमा जवळील रस्त्यावरून पायी घरी जात होत्या. याच वेळी अमोल मुळे (29) हा तरुण तिथे दबा धरून बसला होता. स्नेहल काही अंतरावर पोहोचताच अमोलने आपल्या बॅगेतून धारदार कोयता काढला आणि त्यांच्या दिशेने धाव घेतली.
रक्तबंबाळ होऊन कोसळल्या, तरीही वार केले
काही समजण्याच्या आत अमोलने स्नेहल यांच्यावर पाठीमागून हल्ला चढवला. त्याने स्नेहल यांच्या मान, पाठ, खांदा आणि कंबरेवर कोयत्याने सपासप 8 वार केले. हल्ल्यामुळे स्नेहल रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळल्या. मात्र, त्या खाली पडल्यानंतरही अमोल त्यांच्यावर वार करतच राहिला.
भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच आरडाओरड झाली. त्यावरून जाणारे काही प्रवासी मदतीसाठी थांबले आणि पाहता पाहता गर्दी जमा झाली. लोकांची गर्दी पाहून आरोपी अमोलने तिथून पळ काढला. मात्र, घाईगडबडीत तो आपली बॅग आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता घटनास्थळीच सोडून पळून गेला.
प्रकृती अत्यंत गंभीर; पोलिसांकडून नराधमाचा शोध सुरू
रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या स्नेहल यांना नागरिकांनी तातडीने पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि आरोपीची बॅग जप्त करत पुरावे गोळा केले आहेत.
आरोपी अमोल मुळे हा न्यायालयात शिपाई असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून शोधमोहीम सुरु केली आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि जुन्या वादातून झाला याचा तपास पोलीस करत आहेत.




