दुर्दैवी अपघातात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांनी गमावला जीव
अहिल्यानगर / विशेष प्रतिनिधी
नेवासा येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. ही तिन्ही भावंड बुलेट ने नातेवाईकांकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला पुतणगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ माजली आहे.तर गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळीचिंचोरा येथील अंबादास आहिरे यांनी घरगुती वापरासाठी तीन दिवसांपूर्वीच नवी दुचाकी खरेदी केली होती. घरात नवीन गाडी आल्याने तिघेही भाऊ प्रचंड आनंदात होते. गुरुवारी रात्री हे तिघे भाऊ याच नवीन दुचाकीवर राहाता येथील आपल्या नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघाले. नेवासा-श्रीरामपूर मार्गाने जात असताना पुनतगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली.
आदित्य अंबादास अहिरे वय 16 वर्षे, दीपक अंबादास आहिरे वय 14 वर्षे आणि चैतन्य अंबादास आहिरे वय 12 वर्षे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघात प्रकरणी दादासाहेब मुरलीधर आहिरे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


