वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला संशयास्पद स्थितीत

हैदराबाद / विशेष प्रतिनिधी
आपल्या मित्रासोबत हॉटेल मध्ये आलेल्या तरुणीचा मृतदेह हॉटेल च्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. विद्यार्थिनी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण सुरू होतं. कोमती श्रीजना वय २७ अस त्या तरुणीचे नाव आहे.
हैदराबादच्या मियापूर परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत तिचा मृतदेह सापडला. ती मूळची संगारेड्डीची रहिवासी होती. हनमकोंडा येथील एका वैद्यकीय रुग्णालयातून ती पीडियाट्रिक्सचं शिक्षण घेत होती.
श्रीजना ३० सप्टेंबरला हैदराबादला आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मित्रानं सोन्याची चेन परत करण्यासंदर्भात बोलण्यासाठी तिला हॉटेलात बोलावलं. त्यानंतर दोघे हॉटेलमध्ये गेले. श्रीजनाचा मित्र १ ऑक्टोबरला हॉटेलातून बाहेर पडला. त्यानंतर तो परत आलाच नाही. त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही.
कुटुंबियांनी श्रीजनाला अनेकदा कॉल केले. पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. कुटुंबानं पोलिसांशी संपर्क साधला. तिच्या मोबाइलचं लोकेशन मियापूर येथील ग्रँड ब्रोचिल हॉटेल इथे दिसून आलं. पोलीस हॉटेलात पोहोचले, तेव्हा खोली क्रमांक ५०२ मध्ये श्रीजनाचं शव सापडलं.
श्रीजनाचे वडील के. भूमय्या यांनी पोलीस तक्रार नोंदवली आहे. लेकीची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे मियापूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात पोलिसांना श्रीजनाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला, हे गूढ अद्याप कायम आहे.
पोलिसांनी श्रीजनाचं शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. शवविच्छेदन अहवालातून तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. पोलीस आता हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावांच्या आधारे तपास करत आहेत. श्रीजनाचा हॉटेलमध्ये प्रवेश आणि तिच्या मृत्यूपर्यंतचा घटनाक्रम तपासला जात आहे. याशिवाय तिच्या मित्राचाही शोध सुरू आहे. हा मित्र १ ऑक्टोबरपासून गायब आहे.
श्रीजना ३० सप्टेंबरला हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. श्रीजना हॉटेलला का गेली होती, तिच्या खोलीत कोण-कोण होतं, तिचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.




