गावी आलेल्या एअर होस्टेज ची चाकूने वार करत हत्या

गोंदिया /विशेष प्रतिनिधी
एअर होस्टेज असलेल्या आणि गावी आलेल्या तरुणीचा मृतदेह बोंडराणी परिसरात जंगलात आढळला आहे. तिच्या पाठीवर चाकूचे वार आढळून आले आहेत. हा सगळा प्रकार तिच्या सोबत असलेल्या तरुणाच्या उपस्थितीत घडला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी नितेश अग्रवाल याला ताब्यात घेतले आहे. मृतक तरुणीचे नाव वर्षा धुरणलाल तुरकर (35) असे आहे. ती पुणे परिसरातील एका खाजगी विमान कंपनीत एअर होस्टेज म्हणून कामाला होती. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
जंगलात संशयास्पद अवस्थेत बॉडी
सध्या पुण्यात वास्तव्यास असलेली वर्षा ही महाराष्ट्राच्या शेजारील छत्तीसगडमधील बालाघाट जिल्ह्यातील नवेगाव किन्ही या गावी आली होती. ती एका खासगी विमान कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून नोकरी करत असल्याची माहिती आहे. तिचा मृतदेह दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोंडरानी जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी संशयास्पद स्थितीत आढळला.
शनिवार, १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी तिच्या पाठीवर चार वार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर, गंभीर जखमी झालेल्या वर्षाला खैरलांजी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने केली असावी, असे मानले जात आहे.
मित्राने काय सांगितलं?
घटनेपूर्वी मृत वर्षा ही मित्र नितेश नरेश अग्रवाल याच्यासोबत होती. नितेश हा गोंदियातील मनोहर चौक येथे राहतो. याबाबत नितेशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही दोघे घटनास्थळाच्या परिसरात गाडीतून उतरून बोलत असताना तीन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी लूटमार करण्याचा प्रयत्न केला. त्या तिघांपैकी एकाने वर्षावर चाकूने हल्ला केला.”
ही माहिती वर्षा हिच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबीयांनी नजीकच्या खैरलांजी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. खैरलांजी पोलिसांनी गोंदिया पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीकरिता खैरलांजी येथील रुग्णालयात पाठविला.
सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह, तीन वर्षांची मुलगी
वर्षाचा २०१९ मध्ये प्रेमविवाह झाला. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती रविवारला पुण्याला परत जाणार होती. स्थानिक गुन्हे शाखा व दवनीवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्याकरिता श्वान पथकाची मदत घेतली जात आहे. चौकशीसाठी नितेश अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.




