क्राइम
प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून , भेटायला बोलावून आरोपीने केले सपासप वार

नागपूर / विशेष प्रतिनिधी
एका 17 वर्षीय तरुणाने मित्राला भेटायला बोलावून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या केल्याची घटना उपराजधानीतील कळमना घरातील वाजपेयी नगर येथे घडली आहे. घटनेच्या मागे प्रेम प्रकरण असल्याचे बोलल्या जात आहे. जोहरान मुस्ताक शेख असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोहरान आणि आरोपी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या संपर्कात होते. काही दिवसांपासून त्यांच्यात एका प्रेमप्रकरणावरून वाद सुरू होते. वादावर पडदा टाकण्यासाठी आरोपीने जोहरानला मध्यरात्री कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाजपेयी नगर येथे भेटायला बोलावले.
नेमकं काय घडलं?
मध्यरात्रीची वेळ असल्याने परिसरात शुकशुकाट होता. सुरुवातीला दोघांमध्ये बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच बाचाबाची टोकाला गेली. रागाच्या भरात असलेल्या आरोपीने आपल्याकडे असलेले धारदार शस्त्र काढून जोहरानवर सपासप वार केले. जोहरान रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आरोपीने तिथून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत जोहरानला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पूर्ववैमनस्य आणि प्रेमसंबंधातील त्रिकोणातून हत्या
घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आणि इन्स्टाग्राम चॅटच्या मदतीने पोलिसांनी संशयितांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्य आणि प्रेमसंबंधातील त्रिकोणातून झाल्याचे स्पष्ट होत आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर चिंतेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाइल देताना किंवा त्यांच्या सोशल मीडियावरील हालचालींवर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. कळमना पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून, या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे वाजपेयी नगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.




