क्राइम
सात हजाराची लाच घेतांना तीन पोलिस कर्मचारी अटकेत

श्रीगोंदा /विशेष प्रतिनिधी
अपघाताची माहिती आयआरएडी ऍप मध्ये नोंदवून. गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. सदरची कारवाई ACB च्या अहिल्यानगर पथकाने केली. एकाचवेळी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अहिल्यानगर पथकाने ही धडक कारवाई केली. नितीन अशोक गाडगे (44), रावसाहेब जाधव (38) आणि शासकीय वाहन चालक दादाराम शिवराम म्हस्के (56) अशी कारवाई झालेल्या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान नितीन गाडगे याने अपघाताची माहिती आयआरएडी अॅपमध्ये भरण्यासाठी त्याचा मदतनीस रावसाहेब जाधव याला भेटण्यास सांगितले. तक्रारदाराने संपर्क साधल्यानंतर रावसाहेब जाधव याने अपघाताची माहिती अॅपमध्ये भरून संबंधित गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतःसह नितीन गाडगे यांच्यासाठी तब्बल 10 हजार रुपयांची लाच मागितली.
या मागणीबाबत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अहिल्यानगर पथकाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान तडजोडीनंतर सात जार रुपयांवर व्यवहार ठरल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी ही रक्कम श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील सरकारी वाहन चालक दादाराम म्हस्के याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला आणि म्हस्के याने सात हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने तिन्ही आरोपींवर कारवाई केली.
या प्रकरणामुळे श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एकाचवेळी तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडच्या काळात अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.




