क्राइम
शेतात काम करत असलेल्या महिलेला उचलून नेत रात्रभर तोडले शरीराचे लचके

पाच आरोपीं विरोधात गुन्हा दाखल
बीड / विशेष प्रतिनिधी
शेतात काम करणाऱ्या विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर आळीपाळीने बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बीड जिह्यातील गेवराई तालुक्यातील एका गावात घडली आहे. या नराधमांचे इतकयावर समाधान झाले नसावे म्हणून तिला रात्रभर मारहाण करण्यात आली.आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे हातपाय बांधून तिला शेतात सोडून देण्यात आले.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित विवाहित महिला गेवराई तालुक्यातील एका गावात आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होती. ती शेतात एकटी असल्याचे पाहून दबा धरून बसलेल्या दोघांनी तिच्यावर हल्ला केला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिला जबरदस्तीने उचलून नेले आणि तिचे अपहरण केले.
महिलेसोबत नेमकं काय घडलं?
अपहरण केल्यानंतर दोघांनी विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर तीन जणांनी पीडितेला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. आरोपींनी सर्व मर्यादा ओलांडत पीडितेला रात्रभर एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले. रात्रभर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास गावाजवळील एका निर्जन शेतात तिचे हात-पाय बांधून तिला तिथेच टाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
महिला कोणत्या अवस्थेत सापडली?
महिला सायंकाळ झाली तरी घरी न परतल्यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. त्यांनी रात्रीपासूनच गावात आणि शेजारील परिसरात तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, रात्रभर तिचा कुठेही पत्ता लागला नाही. गावाजवळील एका शेतात ही विवाहिता हातपाय बांधलेल्या आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला या अवस्थेत पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तिची तात्काळ सुटका करण्यात आली.
पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने आणि तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला. पीडितेच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींविरुद्ध अपहरण, अत्याचार आणि बेदम मारहाण या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




