तरुणीचा लग्नास नकार प्रियकराचा तरुणीच्या गळ्यावर वार

पुणे / विशेष प्रतिनिधी
शिक्षण नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे शहर मागील काही काळापासून क्राईम नगरी बनत असल्याचे पाहायला मिळतं आहे. या शहरात भविष्य घडवण्यासाठी आलेली तरुणाई बेफान आणि बेभान होत असल्याचे दिसून येत आहे. तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून तरुणाने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची संताप जनक घटना चंदन नगर परिसरातील पठारे वस्तीत घडली आहे.
पीडित तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणातून हा हल्ला केल्याचं तपासातून समोर आलं आहे. हल्लेखोर प्रियकराने तरुणीच्या गळ्यावर धारदार चाकुने वार केले.
या हल्ल्यात तरुणी रक्तबंबाळ झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी प्रियकर घटनास्थळावरून फरार झाला, अशा अवस्थेत तरुणीने आपल्या भावाला व्हिडीओ कॉल केला. ‘दादा, मला एका मुलाने मारलं आहे. मला गळ्यातून आवाज काढता येत नाहीये. तू लवकर ये…’ असं बोलून तरुणीचा व्हिडीओ कॉल कट झाला. ही घटना मागील आठवड्यात २९ एप्रिल रोजी घडली. आता या तरुणीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती नाजूक आहे.नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हल्लेखोर दिलीप राठोड (२२) आणि पीडित तरुणी हे पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकाच ठिकाणी कामाला होते. याच दरम्यान त्यांच्यात ओळख झाली आणि कालांतराने ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. ही तरुणी अलीकडेच आपल्या मूळगावी गेली होती. घरी गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिचं दुसऱ्या एका मुलासोबत लग्न ठरवलं होतं. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिने आपला प्रियकर दिलीपला लग्न ठरल्याची माहिती दिली. तसेच आता आपलं लग्न होणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.
मात्र, तरुणीचं लग्न दुसरीकडे ठरत असल्याचं समजताच दिलीप संतापला. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून त्याने थेट तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्याने संतापाच्या भरात तरुणीवर धारदार चाकुने हल्ला केला. तिच्या गळ्यावर वार केले. यानंतर आरोपी फरार झाला.कागदावर नाव लिहून दिली साक्ष
जखमी तरुणीला जेव्हा पोलीस आणि डॉक्टरांनी विचारले की ‘हल्ला कोणी केला?’, तेव्हा जखमेमुळे तिला बोलणं अशक्य होतं. अशात तिने केवळ खुणेने कागद आणि पेन मागितला. थरथरत्या हाताने तिने त्या कागदावर आरोपीचं नाव ‘दिलीप राठोड’ असं लिहिलं आणि गुन्हेगाराचा चेहरा समोर आला.तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवून आरोपी दिलीप राठोडला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.




