तांत्रिकाच्या कथित जाळ्यात अडकलेल्या शिक्षिकेची आत्महत्या

अलवर / नवप्रहार ब्युरो
विज्ञान शाप की वरदान हा नेहमीच चर्चेचा वादविवादाचा विषय राहिला आहे. कारण एकीकडे विज्ञान प्रगती करत असला तरी अशिक्षित लोकं तर सोडा सुशिक्षित लोकं देखील अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन तांत्रिक , मांत्रिकाच्या जाळ्यात अडकत आहेत. तांत्रिकाच्या कथित जाळ्यात अडकलेल्या एका शिक्षिकेने आत्महत्या केल्याचे तिच्या सुसाईड नोट मधून समोर आले आहे.
येथील सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने तांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचा पतीही सरकारी शिक्षक आहे. त्यांना २ मुले आहेत. तांत्रिकाच्या कारनाम्यामुळे या २ चिमुरड्याच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपलं आहे.
आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आणि ती बऱ्याच जणांना व्हॉट्सअप केली. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिकाला अटक केली आहे. या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, मी जेव्हा ११ वीच्या वर्गात शिकायची तेव्हा तांत्रिक देवीसहाय कुम्हारच्या घरी कुणासोबत तरी गेली होती. त्यावेळी मला कुठलाही त्रास नसताना त्या तांत्रिकाने बळजबरीने माझा हाता पाहिला. हात पाहिल्यानंतर त्याने माझ्यावर तंत्र विद्या केली. त्यानंतर मी वारंवार आजारी पडत होती. त्याने मला ७ शनिवार बोलावले होते. मी जात नव्हते तेव्हा मला त्रास द्यायचा. ५० हजार रुपये घेतले होते. बीएड करतेवेळीही त्याने तांत्रिक विद्या करून माझा छळ केला असा आरोप तिने केला आहे.
त्याशिवाय मला मजबुरीने त्याच्याकडे जावे लागत होते. नोकरी लागल्यानंतरही २०१७-१८ या काळात तांत्रिकाने मला छळलं. ३ महिने मला ड्युटीवर जाऊ देत नव्हता. मी त्यावेळी खूप त्रस्त झाले. त्याला १५ हजार देऊन पाठलाग सोडवला. त्यानंतर सप्टेंबर २०२४ पासून त्याने माझा आणखी छळ करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे गेल्यानंतर ५-१० दिवस सुरळीत जायचे. १४ फेब्रुवारीला त्याने ५० हजार घेतले. माझ्यावर त्याने वशीकरण केले होते. मला त्याच्याकडे जायचे नव्हते परंतु तांत्रिक विद्येने तो मला खेचत होता. आता मला त्याच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या मृत्यूसाठी देवीसहाय बगड राजपूतचं जबाबदार आहे असं महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, माझ्या मुलांना आईची कमतरता जाणवू देऊ नका असं मृत महिलेने सांगितले. तर आतापर्यंत तांत्रिकाने ८ लाख रूपये फसवून घेतले आहेत. आणखी ५ लाख रूपये मागून त्रास देत होता असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. मयत शिक्षिका गुड्डी मीणा पती आणि २ मुलांसह अलवर येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. संध्याकाळी ४ वाजता मुले ट्यूशनला गेली होती. पती बाजारात गेला होता तेव्हा पत्नी एकटीच घरी होती. त्यावेळी तिने सुसाईड नोट लिहून घरात गळफास घेत आत्महत्या केली.