अल्पवयीन मुलीची हत्या , मृतदेह बॅगेत भरून जंगलात नेऊन जाळला


या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यातील ही घटना आहे.
अंगावर शहारे आणणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, राधिका ही गेल्या चार ते पाच दिवसांपासून अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. सुरुवातीला पोलीस या प्रकरणाकडे केवळ एक मुलगी बेपत्ता झाल्याच्या दृष्टिकोनातून पाहत होते. मात्र, तपासाची चक्रे फिरताच या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारे तथ्य समोर आले. पोलिसांनी कसून शोध सुरू केला असता, बेपत्ता मुलीचा शोध घेताना या संपूर्ण थराराचा पर्दाफाश झाला.
अशी’ केली हत्या
पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने आधी राधिकाची हत्या केली आणि त्यानंतर या गुन्ह्याचा कोणताही सुगावा लागू नये म्हणून तिचा मृतदेह एका मोठ्या बॅगमध्ये बंद केला. यानंतर आरोपीने ती बॅग आपल्या मोटारसायकलवर ठेवली आणि तो एका जंगलात पोहोचला. तेथे त्याने पुरावे नष्ट करण्याच्या आणि मृतदेहाची ओळख पटू नये या उद्देशाने तिला आग लावून दिली. जंगलात एक मानवी सांगाडा सापडल्यानंतर या भीषण हत्याकांडाचा खुलासा झाला. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि परिसरातील संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी आपला तपास पुढे नेला, ज्यामध्ये एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
हत्येचं कारण काय?
संबंधित आरोपी हा भाड्याच्या घरात राहत होता आणि सध्या पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या अत्यंत क्रूर हत्येमागचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी आणि विविध कंगोरे तपासून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या पोलिसांनी सुरुवातीला नोंदवलेला बेपत्ता झाल्याचा गुन्हा आता थेट हत्येच्या गुन्ह्यात बदलला असून, पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.




