क्राइम
दुधातून द्यायचा अमली पदार्थ आणि लैंगिक शोषण करून उकळायचा पैसा


मथुरेच्या गोवर्धन भागातून पोलिसांनी केली अटक
मेकॅनिकल अभियंता असलेल्या तरुणाचा खरा चेहरा आला समोर
मथुरा / विशेष प्रतिनिधी
भोंदू बाबांकडून महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण सतत समोर येत असताना देखील महिला वर्ग भोंदू बाबांच्या कचाट्यात सापडून त्यांच्या वासनेला बळी पडत आहेत. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या आणि वार्षिक वीस लाखाचे पॅकेज असलेला तरुण नोकरी सोडून बाबा बनला. आणि त्यानंतर त्याने असा खेळ खेळला की मथुरेत स्वतःचे आश्रम बनवले.
असे हेरायचा हा तरुण गुरू सावज –
स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणारा हा तरुण उच्चशिक्षित असल्याने त्याच्या बोलण्यात एक अजब आकर्षण होते. तो मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या आणि चांगल्या पगारावर असलेल्या तरुणींना आपले सावज बनवत होता. तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना प्रसाद म्हणून दुधातून गुंगीचे औषध किंवा अमली पदार्थ द्यायचा. तरुणी बेशुद्ध झाल्यावर त्यांचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ बनवायचा.आणि त्या माध्यमातून तरुणांकडून बक्कळ पैसा उकळायचा . अभिषेक मिश्रा उर्फ ‘अधिकारता नारायण दास’ याला राधाकुंड येथील त्याच्या आश्रमातून अटक केली आहे. घटनास्थळावरून दोन तरुणी आणि एका मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सुरेश चंद्र रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक मिश्रा हा मूळचा ओडिशाचा रहिवासी आहे. त्याने २०१७ ते २०२१ या काळात देशातील नामांकित संस्था ‘आयआयटी रुरकी’मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केलं होतं. यानंतर त्याने मुंबईतील एका मोठ्या कंपनीत वर्षाला २० लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरीही केली. २०२३ मध्ये तो नोकरी सोडून मथुरेच्या राधाकुंड भागात आला आणि येथे भाड्याने खोली घेऊन राहू लागला.
तरुणींचं करायचा ब्रेनवॉश
अभिषेक अत्यंत सुशिक्षित असल्याने त्याच्या बोलण्याची पद्धत खूप प्रभावी होती. त्याने गीतेवर ऑनलाईन प्रवचन देणं सुरू केलं. मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हायप्रोफाईल आणि सुशिक्षित तरुणी या त्याचे मुख्य टार्गेट असायच्या. तो ऑनलाईन माध्यमाद्वारे तरुण-तरुणींचं अशा प्रकारे ब्रेनवॉश करायचा की, ते सर्व काही सोडून त्याच्याकडे गोवर्धनला येत असत. तिथे तो मुला-मुलींचे ‘गंधर्व विवाह’ लावून द्यायचा आणि नंतर तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून स्वतः त्यांचं शोषण करायचा. तो तरुणींना देवाचा प्रसाद किंवा चरणामृत सांगून दुधातून अमली पदार्थ द्यायचा. त्या बेशुद्ध झाल्यावर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि त्यांचे आक्षेपार्ह फोटो
ब्लॅकमेलिंगच्या पैशातून बनवला आश्रम
पोलीस तपासात समोर आलं आहे की, आरोपी या अश्लील व्हिडीओ आणि फोटोंच्या जोरावर पीडित तरुणींकडून मोठी रक्कम वसूल करायचा. या ब्लॅकमेलिंगच्या पैशातूनच त्याने राधाकुंड येथे एक घर खरेदी केलं आणि त्याला आश्रमाचं रूप दिलं. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा आरोपीने त्याच्या स्वतःच्या सख्ख्या आईला बेदम मारहाण केली आणि घरातून हाकलून दिलं.
छत्तीसगडच्या विद्यार्थिनीने दाखवलं धाडस
या संपूर्ण खळबळजनक प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा छत्तीसगडची राहणारी बीएससी नर्सिंगची एक विद्यार्थिनी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी मथुरेत आली होती. १५ मे च्या रात्री आरोपी अभिषेकने तिला प्रसादाच्या नावाखाली दुधात अमली पदार्थ मिसळून पाजले आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. पीडिता जेव्हा आपल्या घरी परतली आणि तिने पालकांना आपली आपबिती सांगितली, तेव्हा तिचे वडील तिला घेऊन मथुरेचे एसएसपी (SSP) श्लोक कुमार यांच्याकडे पोहोचले आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.




