क्राइम

बापरे…… चार मित्रांचा तरुणीवर आळीपाळीने १० महिने बलात्कार 

Spread the love
व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तोडले शरीराचे लचके
मिरगूड ( कोल्हापूर) / विशेष प्रतिनिधीं
                        ओळखपत्र बनवून देण्याच्या बहाण्याने जवळीक वाढवत १९ वर्षीय तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. नंतर त्याने तिला आपल्या मित्रांच्या हवाली केले. मुख्य आरोपी सह तिच्यावर आरोपीच्या तीन मित्रांनी सतत १० महिने आळीपाळीने बलात्कार करत तिच्या शरीराचे लचके तोडले. सततच्या छळाला कंटाळून आणि हिंमत एकवटून पीडितने पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सूत्र हलवत लगेच चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आदित्य बाजीराव शेटके, रणजित संभाजी मुधोळकर, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर आणि विक्रम रामचंद्र पाटील असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. यातील आदित्य शेटके हा मुख्य आरोपी असून त्याने पीडित मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. आरोपीनं ओळखपत्र बनवून देण्याच्या बहाण्याने ओळख वाढवली. यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला आपल्या मित्रांच्या हवाली केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके हा सोळांकुर येथे त्याच्या मामाचा फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय सांभाळत होता. याच व्यवसायाच्या माध्यमातून त्याची ओळख पीडित तरुणीशी झाली. एक दिवस ओळखपत्र (आयडी कार्ड) बनवून देण्याच्या बहाण्याने आदित्यने तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले. तिथून त्याने तिला मुरगुड येथील तलाव परिसरातील एका निर्जन झाडीत नेले. तिथे तरुणीचे फोटो काढून ते एडिट केले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पहिल्यांदा बळजबरीने अत्याचार केला.
मित्रांनी आळीपाळीने केले अत्याचार
आदित्यने केलेला अत्याचार सहन केल्यानंतर पीडित तरुणी या नराधमांच्या विळख्यात वाईट पद्धतीने अडकली. मुख्य आरोपी आदित्यने तिची ओळख त्याचा मित्र रणजित मुधोळकर याच्याशी करून दिली. रणजितनेही फोटो व्हायरल करण्याचा धाक दाखवत तरुणीला गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापूर भागातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
हा छळ इथेच थांबला नाही, तर रणजितने पुढे तिची ओळख प्रणवगिरी पालकरशी करून दिली. प्रणवगिरीने तरुणीला कारमध्ये बसवून एका लॉजवर नेत अत्याचार केला. त्यानंतर रणजितने तिची ओळख आणखी एक मित्र विक्रम पाटील याच्याशी करून दिली. विक्रमने देखील “तुझे आधीचे सर्व फोटो-व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण संपवतो,” असं खोटे आश्वासन देत पाचगाव येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
गेल्या १० महिन्यांपासून हे चौघे मित्र आळीपाळीने पीडितेची वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण करत होते. आरोपींच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धीर एकवटला आणि मुरगुड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा दाखल केला आणि काही तासांतच चौघांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close