तो पळाला त्याला वाटले तो पोलिसांना सहज गुंगारा देईल पण …..
गुजरात / नवप्रहार ब्युरो
चोर आणि पोलीस यांच्यात होत असलेला पळापळीचा खेळ हा काही नवीन विषय नाही. पळणे आणि पकडणे ही त्यांच्यातील जुगलबंदी आहे. पण गुजरातच्या दाहोद येथील चोराला माहिती नव्हते की पोलीस हायटेक झाले आहेत. आणि आता त्यांना चकमा देणे कठीण आहे. डोंगराळ भागात पळणाऱ्या चोराचा ड्रोन ने पाठलाग करून पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
पोलिसांच्या या कारवाईचा ‘रिअल टाईम’ व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता भविष्यात चोरट्यांची काही खैर नसणार. पोलिसांना गुंगारा देऊन पळून जायचे असेल तर चोरट्यांना ड्रोनलाही चकवा द्यावा लागणार आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याचे वृत्त दिले आहे. जाणून घ्या संपूर्ण किस्सा…
ही घटना गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील आहे. हा जिल्हा राजस्थान-मध्यप्रदेशच्या सीमेजवळील डोंगराळ भागात आहे. दाहोदचे पोलीस अधीक्षक डॉ. राजदीपसिंह झाला, यांनी बुधवारी याची माहिती दिली. दाहोद पोलिसांकडे राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील मंदिरांमध्ये सातत्याने चोरी करण्याची प्रकरणे समोर येत होती. तसेच या घटनांमुळे जनतेतून तीव्र संताप देखील व्यक्त करण्यात येत होता. पोलीस या चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवून होते. बांसवाडा जिल्हा पोलिसांनी रमेश भाभोर या संशयिताची माहिती दिली होती. बांसवाडा पोलिसांनी दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयित चोर भाभोरची ओळख पटली होती. यापूर्वीही त्याला दाहोदच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते.
चोरटा भाभोर हा गरबाडा तालुक्याच्या मटवा गावात लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भाभोरला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी हायटेक सापळा रचला. डोंगराळ प्रदेश, वन क्षेत्र आणि दूरवर पसरलेली शेती यामुळे चोरट्याला लपून बसणे आणि पोलिसांना चकवा देऊन पळ काढणे सोपे गेले असते. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण भागावर ड्रोनद्वारे नजर ठेवली. त्याचे नेमके लोकेशन शोधून काढले. नंतर प्रत्यक्ष कारवाई केली.
पोलिसांना आपली माहिती समजली असून पोलीस जवळ येत असल्याचे भाभोरला समजले आणि त्याने भल्यामोठ्या क्षेत्रात पसरलेल्या शेतात पळ काढला. मात्र त्याला माहित नव्हते की पोलिसांनी त्याच्या डोक्यावर गरुडाप्रमाणे तीक्ष्ण नजर असलेला ड्रोन कॅमेरा सोडला आहे. चोरटा जिथे जिथे पळत होता ड्रोनद्वारे त्याची माहिती पोलिसांना मिळत होती. अखेर तो पळून पळून थकला आणि पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या हाती लागला.
पोलिसांनी चोरटा भाभोरसह त्याच्याकडून चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या दिलीप सोनी नावाच्या व्यक्तीलाही पकडले आहे. सोनी चोरीचे दागिने वितळवून त्याच्यापासून चांदीच्या पट्ट्या बनवायचा, असा आरोप आहे.
चौकशीदरम्यान, त्याने बांसवाडामध्ये तीन मंदिरांमध्ये चोऱ्या आणि एक घरफोडी, तसेच लिमडीमध्ये आणखी एक मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. तो त्याच्या मोटरसायकलवरून राजस्थानला जात असे, चांदीचे मौल्यवान वस्तू चोरत असे आणि त्याच्या भावाला देत असे, जो दाहोदमध्ये सोनीला त्या वस्तू विकत असे, अशी कबुली त्याने दिली.
पोलिसांनी चोरीच्या दागिन्यांपासून वितळवलेल्या ६.८२ लाख रुपयांचे चांदीचे बार जप्त केले आहेत. तपासात असे दिसून आले की भाभोरला यापूर्वी १० प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती, तर सोनीला चोरीचा माल घेतल्याबद्दल १६ वेळा पकडण्यात आले होते.