बहिणीला ‘नंददीप’च्या फाटकावर सोडून भाऊ पसार
![](https://navprahar.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250110-WA0053-716x470.jpg)
रक्षाबाई दुसऱ्यांदा शिंदे दाम्पत्याच्या आश्रयाला
यवतमाळ : पाठीराख्या भावानेच आपल्या थोरल्या बहिणीला समर्थवाडीस्थित नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या फाटकावर सोडून पळ काढला.ही घटना ८ जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास घडली. निर्दयी अशा भावाकडून दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
सुरक्षा आणि प्रेमाची शिकवण देणाऱ्या बहीण भावाच्या नात्याला तडा देणारी ही घटना रक्षा (केंद्राने दिलेले नाव) या बहिणीच्या वाट्याला आली. वयाची साठी पार केलेली ही महिला मानसिक आजाराने ग्रस्त आहे.७ एप्रिल २०२४ रोजी सोनेगाव (नागपूर) येथे पोलिसांना ती बेवारस अवस्थेत आढळून आली होती.तेव्हा पोलिसांच्या विनंतीवरून तिला संदीप व नंदिनी शिंदे दाम्पत्याच्या नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात भरती करण्यात आले.याठिकाणी तिच्यावर ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत डॉ.श्रीकांत मेश्राम यांचे मानसोपचार चालले.तिच्या समंतीने तिला तिच्या मूळगावी नागी (मंगरूळ,वाशीम) येथे कुटुंबियांच्या स्वाधीनही करण्यात आले.घरी औषधोपचार करून तिचा सांभाळ करण्याची गरज असताना तिच्या कुटुंबीयांनी मात्र तिला दुसऱ्यांदा नंददीपच्या फाटकवर सोडून आपली जबाबदारी झटकली.यापूर्वी या भावाने तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यापूर्वी एका रुग्णवाहिका चालकाच्या हातात सोपवून तेथून पलायन केले होते.अशा घटना सातत्याने घडत असल्याने आपला समाज संवेदनशून्य होत असल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली.
रुग्णवाहिका चालकाने असे गंडविले
रक्षाला एखाद्या डॉक्टरांकडे दाखवून तिची काळजी घेण्याचे सोडून या भावानेच तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात नेण्याचा घाट घातला होता. यातून त्याला आपली सुटका करायची होती.परंतु,त्याठिकाणी दाखल करण्यापूर्वी एका रुग्णवाहिका चालकाने मनोरुग्णालयात भरती करण्या चे आमिष दाखवून पैशाची मागणी केली.त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने रक्षाला रुग्णवाहिकेतही बसविले.परंतु,काही अंतरावर नेऊन तिला तेथूच सोडून त्या चालकाने पोबारा केला.त्यानंतर ७ एप्रिलला ती बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळून आली.त्यांनी ही माहिती नंददीपचे संचालक संदीप शिंदे यांना सांगितली.त्यानंतर त्यांनी केंद्राचे स्वयंसेवक कृष्ण मुळे,कार्तिक भेंडे तसेच स्वप्नील सावळे यांच्या मदतीने तिला आपल्या केंद्रात दाखल केले.
तिला बरे करून घरी सोडले आणि पुन्हा याच भावाने तिला नंदादीपच्या फाटकावर सोडून आपली जबाबदारी झटकली.सुरक्षेची हमी देणारा सक्खा भाऊ जर आपल्या बहिणीची सुरक्षितता धोक्यात आणत असेल तर या नात्याला म्हणावे तरी काय, असा प्रश्न यानिमित्याने उपस्थित होत आहे.