आरोग्य व सौंदर्य

रुग्ण जागा, अन् डॉक्टरांची मेंदूवर शस्त्रक्रिया!

Spread the love

 

लता मंगेशकर रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ यशस्वी

नागपूर /  अमित वानखेडे

न्यूरोसर्जरी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हिंगणा रोड येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ ही विशेष स्वरूपाची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. सुविख्यात न्यूरोसर्जन डॉ. स्वप्नेश चिंधालोरे यांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली.

रुग्णाच्या मेंदूच्या उजव्या बाजूच्या ‘मोटर स्ट्रिप’ या शरीराच्या विरुद्ध बाजूच्या अवयवांच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या भागात गाठ होती. गाठ काढताना मेंदूच्या हालचालींशी संबंधित कार्यक्षम भागाला इजा होऊ नये आणि रुग्णाची हालचाल क्षमता सुरक्षित राहावी, हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते.

हे आव्हान लक्षात घेऊन शस्त्रक्रियेदरम्यान ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ या प्रगत तंत्राचा वापर करण्यात आला. शस्त्रक्रियेच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये रुग्णाला जागृत ठेवून डॉक्टरांच्या सूचनांना प्रतिसाद देण्याच्या स्थितीत ठेवण्यात आले. गाठ काढण्याची प्रक्रिया सुरू असताना रुग्णाच्या डाव्या हाताच्या हालचालींवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.

रिअल-टाइम न्यूरोलॉजिकल निरीक्षणामुळे हाताच्या हालचालींसाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या महत्त्वाच्या भागाचे संरक्षण करत गाठ सुरक्षितपणे काढणे शक्य झाले. शस्त्रक्रियेनंतरच्या हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीत ही गाठ ‘ग्रेड ४ ऑलिगोडेंड्रोग्लिओमा’ असल्याचे स्पष्ट झाले.

डॉ. स्वप्नेश चिंधालोरे यांनी सांगितले की, मेंदूच्या अत्यंत संवेदनशील भागात असलेल्या गाठींवर उपचार करताना केवळ गाठ काढणे पुरेसे नसून रुग्णाची न्यूरोलॉजिकल कार्यक्षमता सुरक्षित ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. ‘अवेक क्रॅनियोटॉमी’मुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या न्यूरोलॉजिकल कार्यक्षमतेचे त्वरित मूल्यांकन करता येते.

या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार डॉ. आशिषराव देशमुख, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे, सीओओ डॉ. अनुज तिवारी, उपअधीक्षक व सर्जरी विभाग प्रमुख डॉ. सुश्रुत फुलारे यांनी डॉ. स्वप्नेश चिंधालोरे, बधिरीकरण विभागप्रमुख डॉ. केतकी मारोळकर, डॉ. अजित ज्योतीपुरकर आणि संपूर्ण वैद्यकीय चमूचे अभिनंदन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close