सामाजिक

मालकिणीच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करणारा कुत्रा चर्चेत

Spread the love

संगमनेर /विशेष प्रतिनिधी 

 कुत्रा हा सर्वात प्रामाणिक आणि निस्सीम प्रेम करणारा प्राणी मानला जातो, याचाच अत्यंत भावूक प्रत्यय भोर तालुक्यातील संगमनेर गावात पाहायला मिळत आहे. आपल्या वृद्ध मालकिणीच्या निधनानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे अन्नत्याग केला असून, मालकिणीच्या विरहाने तो तासन्तास अश्रू ढाळत बसून आहे.

संगमनेर येथील शालन बांदल या वृद्ध महिलेचे शुक्रवारी (दि. ४) वृद्धापकाळाने निधन झाले.

शालन यांनी वाघ्याला लहानपणापासून अत्यंत मायेने सांभाळले होते. त्यामुळे तो गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत सावलीसारखा राहत होता. मालकिणीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला घराबाहेर काढल्यापासून वाघ्या अत्यंत शांत व निराश झाला आहे. घरच्यांनी त्याला दूध, चपाती आणि अन्न देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने अन्नाचा एक कणही शिवलेला नाही. मालकीण आजारपणात ज्या ठिकाणी झोपायची, तिथेच डोळे लावून तो तासन्तास बसून राहतो.

सावडण्याच्या विधीला हजेरी –
संगमनेर गावची स्मशानभूमी भाटघर धरणाच्या भिंतीजवळ, घरापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर आहे. शालन बांदल यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सावडण्याच्या विधीसाठी वाघ्याने स्वतः अडीच किलोमीटर अंतर चालत जाऊन हजेरी लावली. विधी सुरू असताना तो शेजारीच बसून अश्रू ढाळत होता. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

“वाघ्या आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. आई गेल्यापासून त्याने अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. आम्ही दररोज दिवसातून तीन-चार वेळा त्याच्यासमोर दूध-चपाती ठेवतो, परंतु तो अन्नाकडे न बघता आई ज्या ठिकाणी बसायची, तिथेच बघून अश्रू ढाळत राहतो. त्याचे हे दुःख पाहून आम्हालाही आवरत नाही.”
– बांदल कुटुंबीय, संगमनेर (ता. भोर)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close