जुन्या पासपोर्ट ची माहिती लपवून नवीन पासपोर्ट घेणारी नमिरा एटीएस च्या ताब्यात


मुंब्रा /विशेष प्रतिनिधी
मुंब्रा येथील 19 वर्षीय तरुणीची महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून (एटीएस) चौकशी केली जात आहे. तरुणीने नव्या पारपत्रासाठी ( पासपोर्ट ) अर्ज करताना माहिती लपविल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तरुणीच्या वडिलांची इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी कथित संबंध होते. त्यामुळे तिची तरुणीची चौकशी सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. नमीरा तारिक खान असे या तरुणीचे नाव असून एटीएसच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. या घटनेनंतर पथकाकडून आता तिच्या परदेश प्रवासाची माहिती घेतली जात आहे. तिने काही आखाती देशांमध्येही प्रवास केल्याचे कळते आहे.
19 वर्षीय तरुणीचा नवीन पासपोर्ट एटीएसच्या (ATS) तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तिने जुन्या पासपोर्टची माहिती न देता नवीन पासपोर्ट मिळवल्याचा आरोप असून, तिचे वडील तारिक खान यांचा यापूर्वी ‘इंडियन मुजाहिदीन’ (IM) आणि ‘सिमी’ (SIMI) यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे.
एटीएसच्या प्राथमिक चौकशीनंतर, मुंब्रा पोलिसांनी नामिरा तारिक खान हिच्या विरोधात पासपोर्ट कायद्याचे कलम 12(1)(ब) आणि बीएनएस (BNS) च्या कलम 318(2), 212 व 3(5) अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तपास यंत्रणा आता नामिराचे जुने आणि नवीन पासपोर्ट, तिचे परदेश दौरे आणि फरारी असलेल्या तिच्या वडिलांशी काही संपर्क होता का, यांबाबतची माहिती गोळा करून त्यातील दुवे जोडण्याचे काम करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या नामिरा तारिक खान हिने अपूर्ण माहिती देऊन नवीन पासपोर्ट मिळवल्याची माहिती एटीएसला (ATS) मिळाली होती. या प्रकरणाचा तपास केला असता, नामिराकडे यापूर्वीच उत्तर प्रदेशातील लखनौ येथून जारी केलेला पासपोर्ट असल्याचे एटीएसच्या निदर्शनास आले. तपास यंत्रणांच्या मते, नवीन पासपोर्टसाठी अर्ज करताना आधीच्या पासपोर्टचा तपशील देणे अनिवार्य असते; मात्र, नामिराने तिच्या जुन्या पासपोर्टबाबतची माहिती दिली नाही आणि मुंब्रा येथून नवीन पासपोर्ट मिळवला, असा आरोप आहे. ही बाब समोर आल्यानंतर, एटीएसने तिच्या जुन्या पासपोर्टबाबत आणि तिच्या परदेश प्रवासाच्या तपशीलांबाबत चौकशी सुरू केली.
तपासात काय समोर आलं?
नमिराने बनावट पोसपोर्ट आधारे सौदी आणि पाकिस्तान मध्ये प्रवास केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. नमिरा खान दोन वेळा बनावट पासपोर्ट आधारे सौदीला जाऊन आली.
तिने खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवले होते. कुर्ला आणि लखनऊच्या पत्त्यावरुन काढलेल्या बनावट पासपोर्टच्या आधारे सौदीला जाऊन दहशतवादी वडिलांना भेटून आली होती
आई शबानाही फरार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नमिराचा नवीन पासपोर्ट आणि एटीएसचा (ATS) वाढलेला तपास यांबाबतची माहिती समोर आल्यानंतर तिची आई शबाना देखील फरार झाली आहे. शबानाने अलीकडेच आपला पासपोर्ट नूतनीकरण (रिन्यू) करून घेतला होता, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
एटीएस आता नमिरा, तिची आई शबाना आणि फरार वडील तारिक खान यांच्यातील संभाव्य संबंधांचा तपास करत आहे. याव्यतिरिक्त, नमिराने जुन्या पासपोर्टची माहिती लपवून नवीन पासपोर्ट का मिळवला आणि तिच्या परदेश दौऱ्यांचा उद्देश काय होता, याचाही शोध ही यंत्रणा घेत आहे.
वडिलांचे ‘इंडियन मुजाहिदीन’ आणि ‘सिमी’शी संबंध
तपासादरम्यान तपास यंत्रणांना असे आढळून आले की, नमिराचे वडील तारिक खानचे नाव ‘इंडियन मुजाहिदीन’ (IM) आणि ‘सिमी’ (SIMI) यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये समोर आले होते. परिणामी, एटीएसने (ATS) या प्रकरणाची दखल अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तारिक खानच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. यातील पहिला गुन्हा 2001 मधील असून, त्यात त्यांच्यावर बंदी घातलेल्या ‘सिमी’ या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप होता.
त्यानंतर, 2006 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने त्याच्यावर ‘यूएपीए’ (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढे 2011 मध्ये, बनावट चलनाच्या संदर्भात त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातही ‘यूएपीए’च्या कठोर कलमांचा वापर करण्यात आला होता.
प्रक्षोभक भाषणांद्वारे तरुणांचे कट्टरपंथीयकरण केल्याचा आरोप
सूत्रांनुसार, तारिक खान त्याच्या प्रक्षोभक भाषणांसाठी ओळखला जात असे. ‘इंडियन मुजाहिदीन’ आणि ‘सिमी’ (SIMI) यांसारख्या संघटनांसाठी तरुणांची भरती करण्यात आणि त्यांना कट्टरपंथीय विचारसरणीकडे वळवण्यात त्याने भूमिका बजावली होती, असा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे
तपास यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तारिक खान हा ‘इंडियन मुजाहिदीन’चे सदस्य रियाझ भटकळ आणि यासिन भटकळ यांचा निकटवर्तीय मानला जात असे. तसेच, त्याने अनेक तरुणांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तैयबा’च्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाठवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
भारत-नेपाळ सीमेवरील कथित प्रशिक्षण केंद्राशी संबंध
सूत्रांनुसार, 2006 मध्ये भारत-नेपाळ सीमेजवळ ‘इंडियन मुजाहिदीन’शी संबंधित एक कथित प्रशिक्षण केंद्र कार्यरत होते. तारिक खानने तरुणांना प्रशिक्षणासाठी या केंद्रावर पाठवले होते आणि या केंद्राच्या कामकाजातही त्याने भूमिका बजावली होती, असा आरोप आहे.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, 2007 मध्ये तारिक खानने ‘इंडियन मुजाहिदीन’शी संबंधित अनेक तरुणांना पुण्याच्या कोंढवा भागात आश्रय दिला होता. त्या काळात तो स्वतः तिथे उपस्थित होता आणि त्याने तरुणांना मोबाईल फोनशी संबंधित प्रशिक्षण दिले होते, असा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
2011 नंतर देश सोडून पळून गेल्याचा संशय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तारिक खान 2011 नंतर देश सोडून पळून गेला होता. तो आखाती देशात लपून बसला असावा, असा तपास यंत्रणांना संशय आहे. एटीएस (ATS) आता नमिराचा जुना पासपोर्ट आणि तिच्या परदेश प्रवासाचा इतिहासही तपासत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नमिराकडे अल्पवयीन असताना लखनौमधून जारी केलेला पासपोर्ट होता; याच पासपोर्टचा वापर करून तिने 2014 आणि 2016मध्ये आखाती देशांचा प्रवास केला होता.




