रक्षकच भक्षक बनल्याचे आले समोर ; महिलेची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. पण जसे एक आंबा इतर आंब्याना सडवतो तसेच काही पोलिसांच्या गैरवर्तनामुळे पोलीस विभागावर ताशेरे ओढले जाते. उत्तराखंड मध्ये घडलेल्या एका घटनेने पोलीस विभागाची बदनामी झाली आहे. पीडितेने याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. संबंधित कर्माचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका पोलिसाने विवाहित महिलेला जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा दबाव टाकल्याची आणि पतीला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
पीडित महिला आपल्या पतीसह गाझियाबादमधल्या शालिमार गार्डन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहते. तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे, की त्यांचा एक नातेवाईक उत्तराखंड पोलिसांमध्ये काँस्टेबल आहे. तो एसएसपी हरिद्वार कार्यालयात डाक मुन्शी म्हणून कार्यरत आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी आरोपी पोलीस कर्मचारी पीडित महिलेच्या घरी आला होता. तेव्हा ती घरी एकटीच होती. तेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला. पीडित महिलेने त्यासाठी नकार दिला आणि तिने त्याला जायला सांगितलं. तेव्हा तो रागावला आणि त्याने तिला शिव्या घातल्या. तसंच तिच्या पतीला तुरुंगात टाकण्याची धमकीही त्याने दिली.
आरोपीने दिली धमकी
एवढं झाल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी तिला धमकी देऊन पळून गेला. पीडितेचा पती घरी आल्यानंतर तिने पतीला हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या पतीने बाकीच्या नातेवाईकांच्या माध्यमातून आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने पुन्हा एकदा धमकी दिली. त्यानंतर मात्र पीडिता आणि तिच्या पतीने पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन मदतीची याचना केली.
महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
शालिमार गार्डन पोलीस ठाण्याच्या एसीपी सलोनी अग्रवाल यांनी सांगितलं, की पीडित महिलेच्या तक्रारीनुसार त्यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी तपास सुरू आहे. ज्यांनी जनतेच्या संरक्षणाचं आणि न्यायाचं काम करणं अपेक्षित आहे, त्यांनीच असं दुष्कृत्य केल्यास काय करायचं, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.