पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क
स्पा सेंटर च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्यावसायावर समाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून 3 विदेशी आणि 2 भारतीय तरुणींची सुटका केली असुन व्यवस्थापकाला अटक केली आहे.
प्रशांत रामकृष्ण दंडगे (वय ४०, रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रेश्मा कंक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील हेल्थ अँड क्लिनीक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनीक थाई स्पा येथे शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील लेन नं. ७ मध्ये गोल्ड फिल्ड पार्क ही सोसायटी आहे. तेथे हेल्थ लॅड क्लिनिक, थाई स्पा व हेल्थ स्पॉट क्लिनिक थाई स्पा नावाने मसाज सेंटर आहे. तेथे मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर तेथे छापा टाकला. तेव्हा तेथे ५ तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले. त्यांची रेस्क्यु फाऊंडेशन येथे रवानगी करण्यात आली आहे. व्यवस्थापक प्रशांत दंडगे याला अटक केली असून पोलीस निरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, रेश्मा कंक, अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार या प्रथकाने ही कारवाई केली.