प्राथमिक सदस्य नोंदणीचा दिड कोटींचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे
भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर
अकोले ( प्रतिनिधी ) ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिकाधिक बलवान असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संघटन पर्व अभियानाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या अभियानाच्या अंतर्गत आपण आतापर्यंत १ कोटी प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण केली असून, दीड कोटी चा टप्पा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे मत भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्यक्त केले.
अकोले भाजपा कार्यालयात संघटन पर्व अभियान अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा राष्ट्रीय सचिव माजी आमदार वैभवराव पिचड हे होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोहित चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सोमदास पवार, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, गिरजाजी जाधव, सुनील दातीर, सोनाली नाईकवाडी, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, कल्पना सुरपुरिया आदी उपस्थित होते.
श्री. दिनकर बोलताना म्हणाले की, सदस्य नोंदणी चा विक्रम घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे दूरदर्शी मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. त्यांच्या परिश्रमातूनच हा महत्त्वाचा टप्पा पार करता आला आहे. यशाच्या या टप्प्यावरही न थांबता, आपण दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करू. हे लक्ष्य लवकरच गाठू, असा दृढ विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार वैभवराव पिचड यांनी बोलताना म्हटले की, अकोले तालुका आदिवासी असल्याने ऑफलाईन पद्धतीने पन्नास हजार सदस्य नोंदणी करणार असून ऑनलाईन पद्धतीने विस हजारापेक्षा जास्त होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे यांनी सूत्रसंचालन राहुल देशमुख यांनी तर आभार सचिन जोशी यांनी मानले.