पाच वर्षाच्या मुलाने तोंड उघडले आणि बापाच्या गळ्यात फाशीचा फंदा ?


माहोबा (युपी ) / विशेष प्रतिनिधी
दारूच्या नशेत असलेल्या हनीफ ने पत्नीवर कोयत्याने वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी तपास सुरू केला. पाच वर्षाच्या मुलाने तोंड उघडले आणि बापाच्या गळ्यात लटकला फाशीचा फंदा?
उत्तर प्रदेशातील माहोबा येथे एका गर्भवती महिलेची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान महिलेच्या पाच वर्षाच्या मुलाने दिलेल्या साक्षीमुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला आणि सगळ्यांना धक्काच बसला.
याचं कारण मुलाच्या वडिलांनी म्हणजे पीडित महिलेच्या पतीनेच तिची हत्या केली होती. महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. आरोपी पतीने दारुच्या नशेत तिला ठार केलं.
आरोपीची ओळख हनिफ मन्सूरी अशी पटली आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक विसंगती होत्या. यादरम्यान त्यांच्या मोठ्या मुलाने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. फैजान याने पोलिसांना वडिलांनी दारुच्या नशेत आईवर कोयत्याने हल्ला केल्याचं सांगितलं.
ही घटना शनिवारी रात्री उशिरा पनवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिज्रारी गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, दारू आणि जुगाराचे व्यसन असलेला हनीफ मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. त्याने मद्यपान केल्याबद्दल त्याची पत्नी मनीषा मन्सुरी (27) हिने आक्षेप घेतला, ज्यामुळे त्यांच्यात वाद झाला.
कौटुंबिक वादाचं रूपांतर लवकरच एका जीवघेण्या घटनेत झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीफने धारदार कोयत्याने मनीषावर एकामागून एक वार केले. हल्ल्यात मनिषाच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याच्या वेळी ती सुमारे आठ महिन्यांची गर्भवती होती.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हनीफने पाच वर्षीय मुलगा आणि दोन वर्षांच्या मुलीसमोर त्यांच्या आईची हत्या केली. या घटनेनंतर फैजान प्रचंड मानसिक धक्क्यात आणि भीतीच्या छायेत आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हनिफने हत्येनंतर रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांना फोन करून आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्याच्या खुणा आढळून आल्या. कुलपहारचे सर्कल ऑफिसर अनिरुद्ध सिंह यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान हनिफने घटनेबाबतची आपली माहिती वारंवार बदलली, ज्यामुळे संशय बळावला.
“जोडप्याच्या पाच वर्षांच्या मुलाने नंतर पोलिसांना वडिलांनीच हत्या केल्याची माहिती दिली. मद्यधुंद अवस्थेत वडिलांनी त्याच्या आईवर कोयत्याने अनेकदा वार केले,” असं सिंग यांनी सांगितलं. मुलाच्या या जबाबावरून अधिक चौकशी करण्यात आली, ज्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला आणि त्याला अटक करण्यात आली.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केला की, हनीफ हा संशयी स्वभावाचा होता आणि तो अनेकदा आपल्या पत्नीचा छळ करत असे. ग्रामस्थांनी सांगितले की, त्याला मद्यपान आणि जुगाराचे गंभीर व्यसन जडले होते आणि या व्यसनांसाठी त्याने आपली शेतजमीन विकली होती.
आरोपीचे वडील सुलेमान यांनी आपल्या मुलासाठी कठोर शिक्षेची मागणी केली असून, त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असं म्हटलं आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं असून, दोन लहान मुलांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरवलं आहे.




