स्व.ॲड.भैय्यासाहेब काळे यांच्या पुण्यतिथी ते जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन…

आर्वी / प्रतिनिधी
भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्था चे अध्यक्ष स्व.ॲड.भैय्यासाहेब काळे यांची पुण्यतिथी 21 ऑगस्ट व जयंती 19 सप्टेंबर या पूर्ण महिन्याभरामध्ये कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आर्वी येथे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात भर पडण्याकरता विविध उपक्रमाचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 21 ऑगस्ट 2024 ला स्व.ॲड.भैय्यासाहेब काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वाचन प्रेरणा दिनाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आवडत्या विषयाचे पुस्तकाचे वाचन केले. यादरम्यान मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर स्व.ॲड.भैय्यासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली व सामूहिक पसायदान घेण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष ॲड.शोभाताई काळे यांनी उपक्रमाला आवर्जून भेट दिली. त्यावेळी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. दीपक चव्हाण व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर प्रत्येक शनिवारी वादविवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वादविवाद स्पर्धेसाठी भारतीय शिक्षणप्रणाली रोजगाराभिमुख आहे. हा विषय होता. वकृत्व स्पर्धेसाठी भारतीय राजकारणातील युवा पिढीची भूमिका हा विषय होता. तर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने रासेयो विभाग, सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग, हिंदी विभाग, अर्थशास्त्र विभाग, इतिहास विभाग, गृहअर्थशास्त्र विभाग, वाणिज्य विभाग, इंग्रजी विभाग, विज्ञान विभाग, कनिष्ठ महाविद्यालय या सर्व विभागातील प्राध्यापकांनी आपल्या सहयोग देऊन या सर्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
स्व.ॲड.भैय्यासाहेब काळे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 126 विद्यार्थ्यांनी हिमोग्लोबिन तपासण्यात आले, 57 विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करण्यात आली व 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रेनबो रक्त संकलन रक्तपेढी नागपूर चे डॉ.रवी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान पार पडले. या निमित्तानेच महाविद्यालयामध्ये दत्तक पालक योजनेचा दत्तक विधानाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक गरीब व होतकरू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करतात. ही नाविन्यपूर्ण योजना महाविद्यालयात गेल्या 15 वर्षापासून सुरू असून स्व.ॲड.भैय्यासाहेब काळे यांच्या जयंतीदिनी याचा शुभारंभ केला जातो.त्यानंतर प्रतिमेला पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी कृषक शिक्षण संस्था, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.शोभाताई काळे, सचिव श्री.प्रदीपभाऊ काळे, कोषाध्यक्ष श्री.संदीप भाऊ काळे, प्राचार्य डॉ.रवींद्र सोनटक्के तसेच मोठ्या प्रमाणात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांची उपस्थिती होती.
स्व.ॲड.भैय्यासाहेब काळे यांच्या विचाराला साजेसे विषयावर या सर्व स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित हे सर्व उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया कृषक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.शोभाताई काळे यांनी दिली.


