NEET परीक्षा केली उत्तीर्ण पण प्रवेशासाठी पैसेच नाहीत

घरात अठराविश्व दारिद्र्य, परिस्थितीवर मात करत त्याने केली NEET परीक्षा उत्तीर्ण पण प्रवेशासाठी पैसेच नाही
नांदेड / विशेष प्रतिनिधी
घरात अठराविश्व दारिद्र्य.अशाही स्थितीत त्याने NEET परिक्षा उत्तीर्ण केली. त्याचा एका सेमी शासकीय कॉलेज मध्ये नंबर देखील लागला.पण तेथे भरायला पैसा नसल्याने त्याला लोकांच्या शेतात मजुरी करावी लागत आहे. या पठ्याने देखील हार न मानता आणि कुठलीही लाज न बाळगता लोकांच्या शेतात मजुरी सुरू केली आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही संघर्षगाथा आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा शहराजवळील खडकमांजरी येथील रहिवासी हरिओम वारकड याची.
वडील आठवडी बाजारात भाजीपाला विकतात, तर आई दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबातील मुलाने ‘नीट’ (NEET) परीक्षेत ५१५ गुण मिळवून एमबीबीएस (MBBS) शिक्षणासाठी यश संपादन केलं आहे.
परभणी जिल्ह्यातील एका खासगी (सेमी-गव्हर्नमेंट) वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्याच फेरीत त्याचा प्रवेश निश्चित झाला; परंतु प्रवेश शुल्कासाठी लाखो रुपयांची आवश्यकता असल्यानं या कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फीची रक्कम जमा व्हावी, या आशेनं हरिओम वारकड हा तरुण सध्या आपल्या आईसोबत शेतात मजुरीचं काम करत आहे. त्याच्या या जिद्दीचं आणि धडपडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील मुलगा डॉक्टर होणार, म्हणून…
लोहा शहराजवळील खडकमांजरी येथील रहिवासी माधव वारकड हे विविध आठवडी बाजारात भाजीपाला विकून कुटुंबाचा गाडा चालवतात, तर त्यांची पत्नी पार्वतीबाई मोलमजुरी करतात. त्यांचा मुलगा हरिओम वारकड हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने अत्यंत बिकट परिस्थितीत नीट परीक्षेची तयारी केली. त्याच्या या स्वप्नाला आयआयबी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी मोफत शिक्षण देऊन मोठं बळ दिलं. आयआयबीचे प्रमुख दशरथ पाटील यांनी ११वी आणि १२वी या दोन वर्षांच्या शिक्षणासाठी त्याच्याकडून एक रुपयाही फी घेतली नाही. हरिओमने नीट परीक्षेत ५१५ गुण मिळवून पहिल्याच फेरीत परभणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. गावातील मुलगा डॉक्टर होणार असल्यानं खडकमांजरी ग्रामस्थांकडून त्याचं कौतुक होत आहे.
फीसाठी वडिलांची बँकांकडे धाव, मुलगा शेतात मजुरीवर
हरिओमच्या या यशानं आई-वडिलांना आनंद झाला असला, तरी प्रवेशासाठी लागणारे सुमारे ६ लाख रुपये आणायचे कुठून? असा प्रश्न वारकड कुटुंबासमोर उभा राहिला आहे. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी हरिओमचे वडील विविध बँकांचे उंबरे झिजवत आहेत. वेळेवर पैशांची सोय झाली नाही, तर मुलाचं वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहील, या चिंतेनं आई-वडिलांची झोप उडवली आहे.
भावी डॉक्टराची भर उन्हात मजुरी
दुसरीकडे, एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित झालेला हरिओम ५०० रुपये रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतात काम करत आहे. त्याच्या आईने इतर काही महिलांसोबत सोयाबीन कापणीचे गुत्ता घेतला असून, त्यात हरिओमही आईच्या हाताशी हात लावून मजुरी करत आहे. प्रवेश फीची सोय झालीच, तर वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारी पुस्तके, वह्या आणि ॲप्रन खरेदीसाठी हे पैसे कामी येतील, या आशेवर हा भावी डॉक्टर भर उन्हात मजुरी करत आहे. गरिबीवर मात करून यशाचे शिखर गाठू पाहणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्याला आता दानशूर व्यक्ती आणि समाजधुरिनांच्या मदतीची गरज आहे.




