विदेश
मोटल ला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

वॉशिंग्टन / नवप्रहार डेस्क
दोन वर्षांपूर्वी भारत सोडून उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत अमेरिकेत गेलेल्या सुथार कुटुंबातील तीन लोकांचा मोटल ला लागलेल्या आगीत मृत्यू झाला आहे.
कुटुंबाच्या अकाली निधनानं परिसरावर शोककळा पसरली आहे. तिघांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
हितेशभाई सुथार, त्यांची पत्नी हिनाबेन सुथार आणि २० वर्षीय कन्या ईशानी सुथार अशी मृतांची नावं आहेत. उत्तम भविष्यासाठी कुटुंबानं २ वर्षांपूर्वी भारत सोडला आणि त्यांनी अमेरिकेतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हितेशभाई इकोनो लॉज मोटलमध्ये काम करायचे आणि त्यांचं कुटुंब मोटल परिसरातच वास्तव्यास होतं.
रविवारी रात्री उशिरा दीडच्या सुमारास मोटलमध्ये अचानक आग लागली. त्यानंतर कुटुंब एका खोलीत अडकलं. धोका लक्षात येताच त्यांनी मोटलच्या फ्रंट डेस्कवर कॉल करुन मदत मागितली. खोलीतील बाथरुममध्ये जाण्याचा सल्ला त्यांना फ्रंट डेस्ककडून देण्यात आला. बाथरुममध्ये जा, पाणी सुरू ठेवा आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे धूर आणि आगीपासून तुमचा बचाव होईल, असं फ्रंट डेस्ककडून सांगण्यात आलं. त्या सूचनांचं पालन सुथार कुटुंबानं केलं. त्यांनी तातडीनं बाथरुम गाठलं आणि बचाव पथकाची वाट पाहण्यास सुरू केली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यास आणि मदत-बचाव कार्य सुरू करण्यास बराच वेळ लागला. हा विलंब सुथार कुटुंबाच्या जीवावर बेतला. या कालावधीत खोलीत धूर पसरला. त्यामुळे हितेशभाई, हिनाबेन आणि त्यांची लेक ईशानी यांचा शेवट झाला. जीव वाचवण्यासाठी फ्रंट डेस्कनं त्यांना बाथरुममध्ये जाण्याचा सल्ला त्यांच्या जीवावर बेतला. श्वास गुदमरल्यानं तिघे दगावले.
सुथार कुटुंबाच्या निधनाचं वृत्त त्यांच्या मूळ गावी पोहोचताच नडियाद आणि खेडावर शोककळा पसरली. कुटुंबाचे नातेवाईक, मित्र परिवार, स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली. आग लागण्यामागील नेमक्या कारणांचा शोध स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात आहे. मृतांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी नातेवाईक अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत.



