जनतेला संबोधित करतांना दादा गहिवरले
बारामती / नवप्रहार डेस्क
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी काल (२८ ऑक्टोबर ) रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जनतेला संबोधित करतांना दादांना गहिवरून आले.
दादा बारामती तुन लढणार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर अजित पवार यांनी बारामती येथे एक प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबद्दल बोलताना अजित पवार भावूक झाले होते. तसेच त्यांनी दोन वेळा आवंढा गिळला, भाषण थांबवून पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण चालू ठेवलं.
अजित पवार म्हणाले, ‘आईने (युगेंद्र पवार यांच्या आईने) सांगितलेलं, माझ्या दादाविरोधात (अजित पवार) अर्ज भरू नका, परंतु, वडीलधाऱ्यांनी (शरद पवार) त्यांना थांबवायला हवं होतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही’.
अन् अजित पवार भावूक झाले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘आमच्या पक्षाचं आधीच ठरलं होतं की मी बारामतीतून विधानसभेचा अर्ज भरणार आहे. तात्यासाहेब पवारांचं कुटुंब म्हणजे आमचं कुटुंब अत्यंत बिकट परिस्थितीतून इथवर आलेलं आहे. त्यांची आई (युगेंद्र पवार) आज सांगत होती, माझ्या दादाविरोधात अर्ज भरू नका’. हे बोलत असताना अजित पवार भावूक झाले होते, त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यांनी भाषण थांबवलं आणि ते पाणी प्यायले. त्यानंतर ते म्हणाले, ‘मतदारसंघात जे काही चाललंय ते बरोबर नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींनी (शरद पवार) सांगितलं पाहिजे होतं…’
अजित पवार म्हणाले, ‘त्यांना फॉर्म भरायला कोणी सांगितला तर म्हणे साहेबांनी (शरद पवार) सांगितला… मग साहेब (शरद पवार) तात्यासाहेब पवारांचं घर फोडत आहेत का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत. या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कुणी राजकारण करू नये. घरात एकोपा टिकवायला पिढ्यान् पिढ्या जातात. परंतु, घर तुटायला वेळ लागत नाही. मला तुम्हा सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे. घरातली भांडणं चार भिंतींच्या आत ठेवायला हवी. ती चव्हाट्यावर आणायचं कारण नाही. कुटुंबात एकदा का दरी पडली की ती सांधायला दुसरं कोणी येऊ शकत नाही’.