8 कोटी मागितले न दिल्याने 800 कोटीच्या संपत्तीची मालकीण होण्यासाठी पतीचा केला मर्डर
कोडागु ( कर्नाटक )/ नवप्रहार डेस्क
कॉफीच्या मळ्यात तीन आठवड्यापुर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून तो मृतदेह 54 वर्षीय उद्योजक रमेश यांचा असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांची हत्या करून मृतदेह कर्नाटक जिल्ह्यात फेकून देण्यात आला होता. पती तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या साथीदाराने ही हत्या केल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
54 वर्षीय उद्योजक रमेश गेल्या काही आठवड्यांपासून बेपत्ता होते. दरम्यान त्यांची हत्या झाली असून यात पत्नी निहारीका, तिचा प्रियकर निखील आणि अंकुर सहभागी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तिघांनी हत्येचा कट आखल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडल्या होत्या. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
8 ऑक्टोबर रोजी कोडागु यांचा
येथील सुंतीकोप्पाजवळील कॉफी मळ्यात पोलिसांना एक जळालेला मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर पोलिसांनी परिसरातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यावेळी एका लाल मर्सिडीज बेंझने त्यांचं लक्ष वेधून घेतले. ही कार रमेश नावाने नोंदणीकृत असल्याचं आढळून आले. रमेश यांच्या पत्नीने नुकतीच ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तेलंगणातील पोलिसांशी संपर्क साधला जिथे कारची नोंदणी झाली होती.
तपास सुरु असतानाच पोलिसांना रमेशची पत्नी निहारिका पी हिच्या भूमिकेवर संशय आला. ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता तिने तिने रमेशच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचं कबूल केलं. यावेळी तिने आपला साथीदार पशुवैद्यकीय डॉक्टर निखिल आणि अंकुर यांची नावंही सांगितली. तपासादरमयान निहारिकाचे बालपण त्रासदायक असल्याचं पोलिसांना आढळलं. ती 16 वर्षांची असताना तिचे वडील वारले आणि तिच्या आईने दुसरं लग्न केले. तिने शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलं. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यावर ती नोकरी करू लागली. तिने लवकर लग्न केलं आणि आईही झाली. पण नंतर तिचा घटस्फोट झाल आणि पतीपासून विभक्त झाली. हरियाणात असताना आर्थिक फसवणुकीत अडकली आणि तुरुंगात गेली. तुरुंगात तिची अंकुरशी भेट झाली होती.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर निहारिकाने रमेशशी लग्न केलं. त्याचंही हे दुसरे लग्न होतं. रमेशने निहारिकाला आलिशान आयुष्य दिलं, ज्याची तिला सवय झाली. एकदा तिने त्याच्याकडे 8 कोटी रुपये मागितले. रमेशने नकार दिला असता निहारिका चिडली. तिचे निखिलसोबत संबंध होते. तिने निखिल आणि अंकुरसोबत मिळून रमेशची संपत्ती मिळवण्यासाठी त्याच्या हत्येचा कट रचला, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.
हैदराबादमधील उप्पल येथे 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिकाची गळा दाबून हत्या करण्यात आली. आरोपी यानंतर त्यांच्या जागी परतले आणि रोख रक्कम घेऊन बेंगळुरूला निघून गेले. इंधन संपल्यानंतर ते उप्पलपासून 800 किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या कोडागुकडे निघाले. तिथे त्यांनी कॉफी इस्टेटमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह ब्लँकेटने झाकून पेटवून देण्यात आला. त्यानंतर तिघे हैदराबादला परतले आणि निहारिकाने रमेश हरवल्याची तक्रार दाखल केली.
कोडागुचे पोलिस प्रमुख रामराजन म्हणाले की, “सर्व काही पूर्णपणे नष्ट झालं असल्याने आमच्यासाठी हे फार आव्हानात्मक प्रकरण होतं. “तक्रार नोंदवण्याच्या 3-4 दिवस अगोदर मृतदेह जाळण्यात आल्याचं आमच्या लक्षात आलं. आमच्या पथकाने परिसरातील संशयास्पद हालचालींचा तपास सुरू केला. त्यांना शनिवारी रात्री 12 ते 2 वाजण्याच्या सुमारास या परिसरात एक वाहन संशयास्पदरीत्या फिरत असल्याचं आढळून आलं. आम्ही 500 सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु रात्र असल्याने, प्रतिमा अस्पष्ट होत्या. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हे वाहन रमेश नावाच्या व्यापाऱ्याचं असल्याचं आम्हाला समजलं.”
“तपासाच्या आधारे आमच्या संशयाची सुई पत्नी निहारिका आणि पशुवैद्यकीय डॉक्टर निखिल यांच्याकडे होती. आम्ही संशयितांना अटक केली आहे. निहारिका ही प्रमुख संशयित आहे. तिने कारचा मालक रमेश यांची हत्या केल्याचा आरोप आहे. निहारिका, निखिल आणि दुसरा साथीदार अंकुर याने मिळून त्याचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली,” असं त्यांनी सांगितलं.