रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात सुरू आहे कामगारांच्या जीविताशी खेळ

रांजणगाव / विशेष प्रतिनिधी
कुठल्याही कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षात्मक साधन पुरविण्याची जबाबदारी ही कंपनी आणि कामगार ठेकदारांची असते. पण रांजणगाव एमआयडीसी मध्ये कामगारांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथे कारखाना मालक आणि ठेकेदारांकडून कामगारांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची ओरड होत आहे. अपघात झाल्यास या दोन्ही कडून तो दाबण्याचा प्रकार होत असल्याची देखील चर्चा आहे.
प्रशासन या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली असून, औद्योगिक सुरक्षा केवळ कागदावरच उरली असल्याचे वास्तव समोर आले आहे.
नुकताच एका नामांकित कंपनीत घडलेल्या गंभीर अपघातानंतर कंपनी प्रशासनाने तो दडपण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. जखमी कामगाराला योग्य उपचार आणि नुकसान भरपाई देण्याऐवजी त्याला कामावरून कमी केल्याचा आरोप होत आहे. एमआयडीसीतील अनेक कारखान्यांमध्ये हेल्मेट, सेफ्टी शूज, ग्लोव्हज आणि सेफ्टी बेल्ट यांसारखी मूलभूत साधने उपलब्ध नसून, धोकादायक यंत्रसामग्रीवर काम करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही दिले जात नाही.
केवळ उत्पादनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामगारांना जीव धोक्यात घालून काम करण्यास भाग पाडले जात आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय केवळ नावालाच उरले असून, प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन तपासणी करण्याऐवजी रूटीन अहवालावरच काम भागवले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे नियम मोडणाऱ्या कंपन्यांचे धाडस वाढले असून कामगारांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात आहेत. अन्यायाविरोधात आवाज उठवल्यास नोकरी जाण्याची भीती असल्याने अनेक कामगार गप्प बसणे पसंत करत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा
या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व कामगार संघटनांकडून केली जात आहे. जर प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून कामगारांना न्याय दिला नाही, तर औद्योगिक पट्ट्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
औद्योगिक विकासावर प्रश्नचिन्ह
रांजणगाव एमआयडीसीसारख्या मोठ्या औद्योगिक केंद्रात जर कामगारांचेच प्राण सुरक्षित नसतील, तर येथील उद्योगांचा विकास हा केवळ कागदावरील दावा ठरतो. प्रशासन आता तरी जागे होऊन कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणार की, आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




