राज्यात बारामतीची निवडणूक सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरण्याचा अंदाज
मुंबई / विशेष प्रतिनिधी
अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडी कडून कोण उमेदवार दिला जातो याकडे राज्याचे लक्ष लागले होते . शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे केले आहे. त्यामुळे या मतदार संघात काका विरुद्ध पुतणे लढत बघायला मिळणार आहे. लोकसभेत याच मतदार संघात वहिनी विरुध्द नणंद सामना रंगला होता. तेव्हा पासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विळा भोपळ्याचे सौख्य निर्माण झाले आहे. त्यामुळे यावेळची विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या अजित पवारांचं यंदाच्या निवडणुकीत काय होणार, याबाबत राज्यभरात मोठी उत्सुकता आहे. बारामती मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागलेलं असतानाच अजित पवार यांनी पहिल्याच सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आमचं घर फोडल्याचा आरोप करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुटुंबातील व्यक्ती आमने-सामने आल्याची सल बोलून दाखवली. तसंच ते म्हणाले की, “घरातील व्यक्ती माझ्याविरोधात अर्ज भरताना मोठ्या व्यक्तींनी याबाबत सांगायला पाहिजे होतं. पण युगेंद्र पवारांना उमेदवारी अर्ज कोणी भरायला सांगितला असं विचारलं तर समोरून उत्तर आलं साहेबांना सांगितलं. म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का?” असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. अजित पवार यांच्या या टीकेला दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनीही थेट मिमिक्री करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे बारामतीच्या लढाईला पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध शरद पवार असं स्वरुप प्राप्त झाल्याचं दिसत आहे. जे अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देत होते, त्याच अजित पवारांनी पुन्हा आपला मोर्चा शरद पवारांकडे वळवल्याने निवडणुकीची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांची डोकेदुखी कशी वाढू शकते?
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने-सामने होत्या. मात्र त्या निवडणुकीत अजित पवार यांनी शरद पवारांवर विविध मुद्द्यांवरून केलेल्या टीकेमुळे निवडणुकीच्या नंतरच्या टप्प्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना रंगला. मागील ५० हून अधिक वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवारांबद्दल बारामतीकरांच्या मनात आस्था आहे. अजित पवारांनी थेट शरद पवारांवरच हल्ला चढवल्याने बारामतीकर भावनिक झाले आणि त्यांनी सुप्रिया सुळेंना मतदानरुपी आपला पाठिंबा दिला. त्यामुळेच अजित पवारांचं वर्चस्व निर्माण झालेल्या बारामती तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना जवळपास ४८ हजार मतांची आघाडी मिळाली. जेव्हा सामन्याचं स्वरुप अजित पवार विरुद्ध शरद पवार असं होतं तेव्हा त्या लढाईत बारामतीकर शरद पवारांनाच निवडतात, हे लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. असं असताना अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत असताना शरद पवारांना अप्रत्यक्षरीत्या का होईना लक्ष्य करून पुन्हा एकदा त्यांच्याशी पंगा घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असेच चित्र राहिल्यास अजित पवार यांना पुन्हा निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र या सामन्याच्या केंद्रस्थानी लोकसभेप्रमाणे पुन्हा शरद पवार हे आल्यास मात्र निवडणुकीचं चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच घरफोडीचा आरोप करून अजित पवारांनी पुन्हा एकदा आपले काका शरद पवार यांना डिवचल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात बारामती विधानसभा निवडणुकीचा रंगही बदलला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष मतदानाची तारीख येईपर्यंत बारामतीच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, दोन्ही बाजूच्या प्रचाराची दिशा नेमकी काय असणार, यावरच विधानसभा निवडणुकीचा निकालही अवलंबून असणार आहे.