पोलिसांनी सुतावरून गाठला स्वर्ग ; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केले जेरबंद
जळालेल्या मृतदेहा शेजारी सापडलेल्या रक्ताने माखलेल्या लाकडा वरून लावला तपास
पुणे / नावप्रहार डेस्क
सुतावरून स्वर्ग गाठणे ही म्हण तुम्ही एकली असेल. याची प्रचिती इंदापूर पोलिसांनी आणून दिली आहे. स्मशान भूमीत जळालेल्या मृतदेहा शेजारी सापडलेल्या रक्त लागलेल्या लाकडावरून पोलिसांनी त्या इसमाच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना जेरबंद केले आहे. कुठलाही ठोस पुरावा नसताना पोलीस पाटील यांनी रक्ताने माखलेले लाकुड स्मशानात पडले असल्याची माहिती दिली होती.
घटना इंदापुर येथील मौजे तावशी गावामध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी कोणतेही धागेदोरे हाती नसताना दोघा आरोपींना जेरबंद केले. तसेच खून झालेल्या व्यक्तीची ओळखही पटवली.
हरिभाऊ धुराजी जगताप ( ७४ रा. गंगाखेड, परभणी ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर ( ३० रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) व त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे ( २३ , रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली.
पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनूसार १६ नोव्हेंबरला वालचंदनगर पोलीस ठाण्यात तावशी गावच्या पोलीस पाटलांकडून एक खबर मिळाली की, गावातील स्मशानभुमीत एक मृतदेह जळत असून त्याच्या शेजारी पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग लागले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच तेथे स्मशानभुमीतील लोखंडी जाळीवर पुर्णपणे जळालेली हाडे तर थोडयाच अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. तेथील काही पडलेल्या लाकडावरही रक्ताचे डाग दिसत होते.
सरणावर फक्त काही हाडे उरली होती. यामुळे नेमका प्रकार लक्षात येत नव्हता. मात्र रक्ताचे डाग ताजे असल्याने हा खूनाचा प्रकार असू शकतो अशा निष्कर्षाप्रत पोलीस आले. प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही तपासात सहभागी झाले. दोन्ही पथकांनी इंदापुर, माळशिरस व फलटण तालुक्यामध्ये जावुन तपास केला. मात्र काही धागेदोरे हाती लागत नव्हते.
दरम्यान, पोलिसांना ही लाकडे एका वखारीमधील असल्याची खबर मिळाली. त्यांनी फलटण येथील गुणवरे गावातील वखारीत तपास केला. तेथे त्यांना समजले की दादासाहेब आणि विशाल हे दोघे मयताच्या अत्यंविधीसाठी लाकडे वाहनामध्ये घेऊन गेले होते. त्यानूसार दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी खूनाची कबुली दिली.
मृत जगताप यांचा पत्नीवर वाईट नजर असल्याचा दादासाहेबला संशय होता. यामुळे त्याने मित्र विशालच्या मदतीने जगताप यांना १५ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सतोबाची यात्रा येथून जेवण करण्यासाठी सोबत घेतले. यानंतर इंदापुर येथील तावशी गावातील स्मशानभुमीजवळ लघवीसाठी गाडी थांबवली. तेथे डोक्यात लाकडी दांडके मारुन खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह स्मशानभुमीत जाळून टाकला.
याप्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक( स्थानिक गुन्हे शाखा) अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, तसे च सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर, यांनी पार पाडली आहे.