पाणीपुरीच्या हातगाडीला चारचाकीची धडक
लाखांदूर / प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी पाणीपुरीची हातगाडी घेऊन जाणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना १५ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दिघोरी/मोठी ते खराशी रस्त्यावर घडली. या घटनेत प्रशांत देशमुख (२८) रा. दिघोरी (मोठी) हा गंभीर जखमी झाला तर साकोली तालुक्यातील एकोडी येथील तन्मय मस्के (१३) व अन्य एक तरुण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. फिर्यादीवरुन इशांत मनोहर वाढवे (१९) या चारचाकी वाहनचालकाविरुद्ध दिघोरी/मोठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी अपघातात जखमी तरुण दिवसभर खुणारी येथे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित जत्रेत पाणीपुरी आणि पॉपकॉर्न विकण्यासाठी गाडी घेऊन गेले होते. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर रात्री हातगाडीने ते पायी गावाकडे जात होते. यावेळी होंडा सिटी कंपनीच्या एम.एच.०२ व्ही.जे.२४५५ क्रमांकाच्या चारचाकीने पायी जाणाऱ्या तीन तरुणांना हातगाडीने धडक दिली. या धडकेत हे तिघेही जखमी झाले. रस्त्याने जाणाऱ्या इतर प्रवाशांनी अपघातात जखमींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत पोलिसांनी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.




